प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीच्या पर्वाला वसुबारसपासून प्रारंभ झाला असून शनिवारी धनत्रयोदशीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. हा दिवस आरोग्याची देवता धन्वंतरी यांचा दिवस असल्याने डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यांमध्ये धन्वंतरीचे पूजन केले. समुद्रमंथनावेळी धन्वंतरी हातामध्ये अमृतकलश घेऊन प्रकट झाले. त्यामुळे धन्वंतरी ही आरोग्य देवता मानली जाते. सर्वांच्या आरोग्यासाठी ही पूजा करण्यात येते.
धन्वंतरीची प्रतिमा उभी करून त्यासमोर कलश ठेवून श्रीफळ, पाच फळे ठेवून विधिवत पूजा करण्यात आली. या निमित्ताने दवाखान्यांमध्ये रांगोळीही रेखाटण्यात आली. आमंत्रितांनी दवाखान्यांमध्ये जाऊन धन्वंतरीचे दर्शन घेऊन डॉक्टरवर्गाला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सायंकाळी न्हाणीघराची स्वच्छता करून तेथे आणि स्वच्छतागृहामध्ये दीप प्रज्वलित करण्यात आला. तसेच कोणालाही अपमृत्यू येऊ नये, यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ कणकेचा दिवा करून तो प्रज्वलित करण्यात आला. याच निमित्ताने सोने व चांदीची खरेदीही करण्यात आली.









