बेळगाव : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या पेट्रोलियम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या ‘बीकॅफे’ या कॅफे ब्रँडने आता उत्तर कर्नाटकात प्रवेश केला आहे. खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव येथील गोगटे पेट्रोल पंपावर बीकॅफेची पहिली शाखा सुरू झाली असून, आधुनिक सुविधांसह उत्कृष्ट खाद्यपदार्थ आणि पेयांचा अनुभव देणारे हे ठिकाण ठरणार आहे. या नव्या शाखेचे उद्घाटन बीपीसीएलचे प्रादेशिक प्रमुख नीरज जैन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बीपीसीएलचे नॉन-फ्युएल बिझनेस टीम लीडर अर्विस धनवीक, फ्रँचायझी मालक करण माने, दीपाली माने, रोहिणी गोगटे, डॉ. मनोज व बीपीसीएलचे अधिकारी होते.
यावेळी अर्विस धनवीक यांनी सांगितले की, बीकॅफे ही भारत पेट्रोलियमची इन-हाऊस कॉफी चेन असून, तिचा टॅगलाईन ‘जस्ट बी यु’ असा आहे. “उत्तर कर्नाटकातील पहिले बीकॅफे बेळगावसारख्या सांस्कृतिक शहरात सुरू झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. बीकॅफे हे फक्त कॉफीशॉप नसून, प्रवाशांना व नागरिकांना विश्रांती आणि आरामाचा अनुभव देणारे ठिकाण आहे. बीपीसीएल आपल्या इंधन केंद्रांवर ग्राहकांना अधिक मूल्यवर्धित सेवा देण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे. भारतीय ब्रँड असल्याने येथे ग्राहकांना अस्सल चव आणि विविधतेचा अनुभव मिळेल.“ सध्या बीकॅफेचे 140 हून अधिक आउटलेट्स देशभर कार्यरत असून प्रवासी व रोजचे प्रवास करणारे ग्राहक यांना आरामदायी व आधुनिक वातावरणात दर्जेदार पेय व खाद्यपदार्थ देणे हा या ब्रँडचा उद्देश आहे.









