दोनवेळा डांबरीकरण होऊनदेखील पायवाट असल्याचा जावईशोध : रास्तारोकोचा ग्रामस्थांचा इशारा
वार्ताहर/कणकुंबी
चिगुळे रस्त्याच्या अडीच किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाच्या कामाला कणकुंबी वलय अरण्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी आडकाठी घातल्याने शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या चिगुळे गावच्या विकासाला खीळ बसली आहे. आता संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कणकुंबी वनखात्यासमोरच रास्तारोको आंदोलन हाती घेण्याचा इशारा दिला आहे. चिगुळे गावच्या अडीच किलोमीटर रस्त्याची पूर्णपणे वाताहात झाली होती. म्हणून प्रशासनाने कणकुंबी ते चिगुळे या 5 किलोमीटर अंतरापैकी अडीच किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कंत्राटदाराने हाती घेतले होते. परंतु कणकुंबी वलय अरण्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम थांबवले आहे. चिगुळे ग्रामस्थांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात भेटून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आडकाठी घालू नये, अशी विनंती केली. मात्र कणकुंबी भागातील विकासकामांना वारंवार विरोध करणाऱ्या अरण्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी एक जावईशोध लावून हसे करून घेतले आहे.
यापूर्वी चिगुळे रस्त्याचे दोनवेळा डांबरीकरण
कणकुंबी ते चिगुळे हे 5 किलोमीटर अंतर असून यापूर्वी माजी आमदार कै.अशोक पाटील यांच्या काळात पहिल्यांदा डांबरीकरण झाले होते. तर माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या काळात दुसऱ्यांदा डांबरीकरण झाले होते. यापूर्वी दोनवेळा डांबरीकरण होऊन देखील कणकुंबी वलय अरण्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी चिगुळे रस्ता अस्तित्वातच नाही, असा रिपोर्ट वरिष्ठांना सादर केला आहे. कणकुंबी ते चिगुळे ही पायवाट आहे, असा खोटा रिपोर्ट सादर करून कणकुंबी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केली आहे. मागीलवेळी अडीच किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. उर्वरित अडीच किलोमीटर रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली होती. गेली चार-पाच वर्षे चिगुळे ग्रामस्थांनी वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही चिगुळे रस्त्याचे काम निधीअभावी रखडले होते. आता निधी मंजूर झाला आहे. मात्र वनखात्याच्या आडकाठी धोरणांमुळे रस्त्याचे काम रखडले आहे.
ग्रामस्थांच्या श्रमदानातून यापूर्वी रस्ता-गटारींची दुरुस्ती
खराब रस्त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकवेळा श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली. यावेळी चिगुळे गावातील नागरिकांनी अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील खड्डे दगड, माती घालून बुजवण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी गटारअभावी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे गटारांची देखील दुरुस्ती करण्यात आली होती. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनाच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर उतरावे लागले होते. आता कंत्राटदाराने रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. तर वनखाते चिगुळे गावच्या विकासाचा अडसर ठरत आहे. संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घातले नाही तर चिगुळे ग्रामस्थांकडून कणकुंबी वनखात्यासमोरच रास्ता रोको आंदोलन हाती घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.









