कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्याकडून कामाची पाहणी
कारवार : येथील काळी नदीवरील कारवार, गोवा आणि अन्य भागाशी जोडणाऱ्या नवीन पूल प्रदेशाची पाहणी कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी केली. शिवाय बांधकाम कंपनीने आयोजित केलेल्या पूजा कार्यक्रमात हेगडे सहभागी झाले होते. कारवार आणि सदाशिवगड दरम्यान असलेल्या काळी नदीवरील सुमारे चार दशकापूर्वी बांधण्यात आलेल्या सुमारे एक कि.मी. लांबीचा जुना पूल गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अचानकपणे कोसळला होता. जुना पूल रात्रीच्यावेळी कोसळल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी सुदैवाने झाली नव्हती. जुना पूल कोसळल्याने जुन्या पुलाला समांतर असलेल्या नवीन पुलावर वाहतुकीचा प्रचंड भार पडला होता. त्यामुळे जुना पूल कोसळलेल्या अगदी पहिल्या दिवसापासून नवीन पूल कुठे बांधायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी कोसळलेल्या जुन्या पुलाचे अवशेष हटवून त्याच ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जुन्या पुलाचे अवशेष हटविण्यात गेले काही महिने निघून गेले आणि आता नवीन पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारकडून 150 कोटीचा निधी मंजूर
दरम्यान, केंद्र सरकारने काळी नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नवीन पूल बांधण्याच्या हालचाली आता गतिमान झाल्या असून ठेकेदार बांधकाम कंपनीकडून आज पूलस्थळी पूजेचे आयोजन केले होते. या पूजा कार्यक्रमात खासदार विश्वेश्वर हेगडे सहभागी झाले होते. तत्पूर्वी त्यांनी पूल स्थळाची पाहणी केली. त्यावेळी भाजपच्या महिला राज्य उपाध्यक्षा आणि कारवारच्या आमदार रुपाली नाईक, कारवारचे नगराध्यक्ष रविराज अंकोलेकर, भाजपचे नागेश कुर्डेकर, सुभाष गुणगी आदी उपस्थित होते.









