वृत्तसंस्था/ डोहा
2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी संयुक्त अमिरातचा संघ आता पात्रतेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आशियाई पात्र फेरी स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात संयुक्त अरब अमिरातने ओमानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
1990 नंतर संयुक्त अरब अमिरातला प्रथमच अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. यासाठी येत्या मंगळवारी होणारा कतारबरोबरचा सामना संयुक्त अरब अमिरातला बरोबरीत सोडविणे गरजेचे आहे. दरम्यान, पात्र फेरी स्पर्धेतील अ गटातील सामन्यात ओमानला पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे पात्र फेरीतील आव्हान समाप्त झाले आहे. 2026 ची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविली जाणार आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेतील गेल्या बुधवारच्या सामन्यात ओमानने कतारला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.
संयुक्त अरब अमिरात आणि ओमान यांच्यातील सामन्यात 12 व्या मिनिटाला ओमानचा पहिला गोल अमजद अलीने केला. त्यानंतर 76 व्या मिनिटाला मार्कुस मेलोनीने संयुक्त अरब अमिरातला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास 7 मिनिटे बाकी असताना लुकासने संयुक्त अरब अमिरातचा दुसरा आणि निर्णायक गोल केला. ब गटातील झालेल्या एका सामन्यात इराकने इंडिनेशियावर 1-0 असा निसटता विजय मिळविला.









