उधमपूरमधील घटनेत हॉटेल-दुकानांचे नुकसान
वृत्तसंस्था/ उधमपूर
जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सोमरोली येथील नरसू बाजार परिसरात रविवारी सकाळी भूस्खलन झाले. या आपत्तीमध्ये अनेक कमर्शियल इमारतींचे नुकसान झाले आहे. सकाळी 11:30 च्या सुमारास भूस्खलन झाल्यामुळे एका नव्याने उघडलेल्या हॉटेलच्या इमारतीचे आणि काही दुकानांचे नुकसान झाले. सुदैवाने बाजारपेठ परिसरातील सर्व इमारती आधीच रिकामी करण्यात आल्या असल्याने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून बचाव पथके, पोलीस आणि स्थानिक अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. या आपत्तीमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.









