काँग्रेस नेते चिदंबरम यांचे वक्तव्य : निर्णय केवळ इंदिरा गांधींचा नव्हता
वृत्तसंस्था/ कसौली
जून 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातून उग्रवाद्यांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेले ऑपरेशन ब्ल्यू स्टार ‘चुकीची पद्धत’ होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:च्या प्राणाद्वारे याची किंमत मोजली. परंतु हा निर्णय केवळ इंदिरा गांधींचा नव्हता. यात सैन्य, पोलीस, गुप्तचर आणि प्रशासकीय अधिकारीही सामील होते असे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन ब्ल्यू स्टारवर मागील 6 महिन्यांमध्ये काँग्रेस नेत्यांकडून दुसरे मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. यापूर्वी 4 मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात 1984 चे ऑपरेशन ब्ल्यू स्टार चूक होती, ज्या चुका 80 च्या दशकात काँग्रेसकडून झाल्या, त्याची जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार असल्याचे यात राहुल गांधी यांनी म्हटले होते.
चिदंबरम यांनी हिमाचल प्रदेशच्या कसौली येथे आयोजित ‘खुशवंत सिंह साहित्य महोत्सवा’त पत्रकार हरिंदर बावेजा यांचे पुस्तक ‘दे विल शूट यू, मॅडम’विषयक चर्चेत भाग घेतला होता. बावेजा यांनी स्वत:च्या पुस्तकात इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्वत:च्या निर्णयाची किंमत स्वत:चे प्राण गमावून फेडल्याचा निष्कर्ष नमूद केला आहे.
कुठल्याही सैन्याधिकाऱ्याचा अपमान न करता मी सुवर्ण मंदिर परत मिळविण्याची ती चुकीची पद्धत होती असे म्हणू इच्छितो. काही वर्षांनंतर आम्ही सैन्याशिवाय ते परत मिळविण्याची योग्य पद्धत दाखविली. ब्ल्यू स्टार चुकीची पद्धत होती. इंदिरा गांधींनी त्या चुकीची किंमत स्वत:चे प्राण गमावून मोजल्याचे मी मानतो असे उद्गार चिदंबरम यांनी काढले आहेत.
पंजाबची समस्या आर्थिक स्थिती
माझ्या पंजाबच्या दौऱ्यांदरम्यान खलिस्तान किंव फुटिरवादाची राजकीय मागणी आता जवळपास संपुष्टात आल्याची जाणीव मला झाली. सद्यकाळातील मुख्य समस्या आर्थिक असून सर्वाधिक अवैध स्थलांतर पंजाबमधूनच विदेशात होत असल्याची टिप्पणी चिदंबरम यांनी केली आहे.
इंदिरा गांधींची हत्या का?
ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. ब्ल्यू स्टारनंतर पंजाबमध्ये उग्रवाद वेगाने फैलावला होता. यानंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. इंदिरा गांधी मुलाखतीसाठी तयार होत स्वत:चे निवासस्थान 1 सफदरगंज रोडच्या शेजारील कार्यालय 1 अकबर रोड येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. प्रवेशद्वारावर इंदिरा गांधींचे सुरक्षारक्षक बेअंत सिंह आणि सतवंत सिंह उपस्थित होते. सतवंतच्या हातात स्टेनगन तर बेअंतच्या हातात .38 बोरची सरकारी रिव्हॉल्वर होती. इंदिरा गांधी समोर येताच सतवंत आणि बेअंतने त्यांच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या होत्या. बेअंतने 5 गोळ्या झाडल्या होत्या, तर सतवंतने स्टेनगनने 25 गोळ्या झाडल्या होत्या.









