वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच येथे झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत यजमान भारताच्या पदकविजेत्या पॅरा अॅथलिट्सचा शनिवारी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पदकविजेत्या पॅरा अॅथलिट्सना या कामगिरीबद्दल सुमारे 1.9 कोटी रुपयांची रोख बक्षीसे वितरीत करण्यात आली.
या स्पर्धेत भारतीय पॅरा अॅथलिट धावपटू सिमरन शर्माने टी-12 विभागातील पुरूषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण तर 200 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळविले. पण तो या समारंभाला काही कौटुंबिय समस्येमुळे उपस्थित राहू शकली नाही. या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 22 पदकांची लयलुट केली.
केंद्रीय क्रीडा युवजन खात्यातर्फे पदक विजेत्यांना केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते रोख रक्कमेची बक्षीसे देण्यात आल्याची माहिती भारतीय क्रीडाप्राधिकरण मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळविणाऱ्या अॅथलिटला प्रत्येकी 10 लाख रुपये तर रौप्य आणि कांस्यपदक मिळविणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी अनुक्रमे 7 लाख आणि 4 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी असून या स्पर्धेत भारताने पदक तक्त्यात दहावे स्थान मिळविले.









