आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
पणजी : गंभीर आजारी असलेल्या ऊग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना उपचाराबरोबरच विशेष काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक इस्पितळात ‘पॅलेटीव्ह केअर’ सुविधा देण्यासाठी विशेष धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. ‘गोमेकॉ’तील सुपर स्पेशालिटी विभागात ‘पॅलेटीव्ह केअर’ सेवेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. युरी डायस अंबोरकर, पूजा सिंग, डॉ. कार्ल जेम्स आणि इतर इस्पितळातील विभागप्रमुख उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी सांगितले की, ‘पॅलेटीव्ह केअर’ धोरण तयार करून ती सेवा सुरू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. घरातील ऊग्ण आणि वयोवृद्ध नागरिकांना अशा सेवेची गरज असते. माझ्या कुटुंबामध्येही असे लोक आहेत. त्यामुळे अशा लोकांना होणाऱ्या त्रासांची मला जाणीव आहे. मी ज्या तऱ्हेची ‘पॅलेटीव्ह केअर’ घेतो त्या पद्धतीची सेवा गोव्यातील सामान्य ऊग्णांनाही मिळावी म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. लवकरच राज्यातील सर्व इस्पितळांमध्ये अशी सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असेही ते म्हणाले.
‘पॅलेटीव्ह केअर’ धोरणासाठी सरकारने डिफिट एनसीडी आणि तेवा यांच्यासमवेत आम्ही सामंजस्य करार केला आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने ही सेवा सर्वांना देणे शक्य आहे. यामध्ये सुरुवातीला काही अडचणी आल्या तरी जनतेची सेवा करण्यास आम्ही बांधील आहोत. ‘पॅलेटीव्ह केअर’ हा एक प्रकारे जनतेचा अधिकार आहे. आम्ही हा अधिकार त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्योदय तत्त्वाचा पुरस्कार करत असल्याने त्याच उद्दिष्ट्याने आम्हीही काम करीत असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.
नंतरच तुये इस्पितळ ताब्यात घेऊ
पेडणे तालुक्यात पुढील 20 वर्षे आरोग्य सेवेबाबतची गरज पूर्ण करणाऱ्या इस्पितळाची गरज आहे. म्हणून तुये इस्पितळासाठी गरजेची यंत्रणा, मनुष्यबळ, डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर गोष्टी झाल्यानंतर आम्ही हे इस्पितळ ताब्यात घेऊ. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी गरजेचे असलेल्या सुविधांसाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री सावंत यांना दिला असल्याची माहितीही मंत्री राणे यांनी दिली.









