वृत्तसंस्था/चेन्नई
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे झालेल्या अटितटीच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीचा 37-36 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात बंगाल वॉरियर्सच्या देवांक दलालने सुपर 10 गुण तर आशिष मलिकने 5 गुण नोंदविले. या विजयामुळे बंगाल वॉरियर्सने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात दहावे स्थान मिळविले आहे. सामना सुरू झाल्यानंतर अंकितच्या चालीवर दबंग दिल्लीने दोन गुणांची आघाडी मिळविली. या सामन्यात आशु मलिकची उणिव चांगलीच भासली. मात्र नवीन रावलने गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या दबंग दिल्लीची आघाडी वाढविली.
पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत बंगाल वॉरियर्सने दलाल आणि हिमांशु नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर दबंग दिल्लीवर आघाडी मिळविली होती. तत्पूर्वी अजिंक्य पवार आणि निरज नरवाल यांनी दबंग दिल्लीला पुन्हा बरोबरी साधून दिली. पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत दबंग दिल्लीने बंगाल वॉरियर्सवर 2 गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर उभयतांमध्ये पुन्हा आघाडीसाठी चुरस पहावयास मिळाली. दबंग दिल्लीने सामना संपण्यास 5 मिनिटे बाकी असेपर्यंत बंगाल वॉरियर्सवर 33-32 अशी केवळ एका गुणाची बढत मिळविली होती. मनजित आणि मलिक यांच्या शानदार चढाईमुळे बंगाल वॉरियर्सने आपली पिछाडी बरीच भरुन काढली. अखेर हिमांशुच्या शानदार चढाईमुळे बंगाल वॉरियर्सने केवळ एका गुणाच्या फरकाने दबंग दिल्लीचा पराभव केला.









