संतप्त प्रवासी वर्गातून निषेध : तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील सुळगा केंबाळी नाला ते महाराष्ट्रहद्द शिनोळीपर्यंतच्या पाच किलोमीटर अंतराच्या महामार्गावर संपूर्ण रस्ता खड्ड्यात हरवल्याने संतप्त प्रवासी वर्गातून निषेध करण्यात येत आहे. या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. बेळगाव वेंगुर्ले हा मार्ग दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्र हद्दीपासून पुढचा भाग चांगला आहे. मात्र सुळगा केबांळी नाला ते महाराष्ट्र हद्द, शिनोळी, तुरमुरी, बाची या कर्नाटक हद्दीतील पट्ट्यामध्ये रस्त्याची दुर्दशा झाली असून, प्रवाशांवर रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. मोठमोठे खड्डे आणि त्यात भरलेले पावसाचे पाणी यामुळे अनेक वाहने खड्ड्यात अडकून नादुरुस्त झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. याचबरोबरच पाणी, खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात घडत असल्याच्या घटना घडत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील प्रवासी व नागरिकांतून करण्यात येत आहे. शासनाला जाग आणण्यासाठी प्रवासी आणि नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने छेडली, रस्त्यामध्ये वृक्षारोपण केले, मात्र याकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, धुळीने हा रस्ता माखल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तरी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.









