वृत्तसंस्था/चेन्नई
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात तेलुगू टायटन्सने हरियाणा स्टिलर्सचा 46-29 अशा 17 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात तेलुगू टायटन्सचा भरत हुडा प्रमुख दावेदार ठरला. त्याचा या स्पर्धेच्या इतिहासातील 100 वा सामना होता आणि त्याने या सामन्यात 20 गुणांसह आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. या सामन्यात भरत हुडाने आपल्या चढायांवर 16 गुण तर 4 टॅकल गुण मिळविले. त्याचप्रमाणे या संघातील विजय मलिकने 8 गुण घेतले. सामन्याला सुरूवात झाल्यानंतर तेलुगू टायटन्सने आक्रमक खेळावर अधिक भर देत विद्यमान विजेत्या हरियाणा स्टिलर्सवर चांगलेच दडपण आणले. सुरूवातीच्या पाच मिनिटांमध्ये विजय मलिकने आपल्या चढाईवर दोन गुण तेलुगू टायटन्सला मिळवून दिल्याने तेलुगू टायटन्सने हरियाणा स्टिलर्सवर पहिल्या पाच मिनिटांत 6-0 अशी आघाडी घेतली होती.
हरियाणा स्टिलर्सतर्फे विनयने पहिला गुण मिळविला. त्यानंतर तेलुगू टायटन्सने अजित पवारच्या शानदार कामगिरीच्या जोरावर हरियाणा स्टिलर्सचे सर्वगडी पहिल्यांदा बाद केले. मयांक सैनीच्या सुपर चालीवर हरियाणा स्टिलर्सने तेलुगू टायटन्सची आघाडी बरीच कमी केली. विनयने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर तेलुगू टायटन्सचे पहिल्यांदाच सर्व गडी बाद केले. त्यानंतर हुडाने सुपर 10 गुण नोंदवित तेलुगू टायटन्सला पुन्हा आघाडीवर नेले. मध्यंतराला 1 मिनिट बाकी असताना तेलुगू टायटन्सने दुसऱ्यांदा हरियाणा स्टिलर्सचे सर्वगडी बाद केले. मध्यंतरावेळी तेलुगू टायटन्सने हरियाणा स्टिलर्सला 26-16 अशी 10 गुणांची आघाडी मिळविली.









