प्रभावशाली-दूरदर्शी साहित्यिकाचा गौरव : दहशतीच्या काळातही कलेच्या सामर्थ्याचे प्रदर्शन
वृत्तसंस्था/स्टॉकहोम
या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार ख्यातनाम हंगेरियन लेखक लास्झलो क्रॅस्नाहोर्कई यांना जाहीर करण्यात आला आहे. स्वीडिश अकादमीने गुरुवारी या पुरस्काराची घोषणा केली. लास्झलो यांच्या कलाकृती खूप प्रभावशाली आणि दूरदर्शी आहेत. जगात दहशत आणि भीतीच्या काळातही ते कलेच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करतात. त्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना (10.3 कोटी रुपये), सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
जगातील सर्वात प्रतिष्ठित सांस्कृतिक सन्मानांपैकी एक असलेल्या साहित्यातील नोबेल पुरस्कारावर यावर्षी हंगेरियन लेखक लास्झलो क्रॅस्नाहोर्कई यांनी मोहर उमटवली. त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी 2024 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना देण्यात आला होता. ऐतिहासिक आघात आणि जीवनातील नाजूकपणाचा शोध घेणाऱ्या त्यांच्या तीव्र काव्यात्मक गद्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
लास्झलो यांच्या पुस्तकांचे चित्रपटांमध्ये रुपांतर
लास्झलो क्रॅस्नाहोर्कई हे हंगेरीच्या सर्वात आदरणीय समकालीन लेखकांपैकी एक आहेत. त्यांची पुस्तके बहुतेकदा तात्विक असतात. तसेच मानवता, अराजकता आणि आधुनिक समाजातील संकटांचा शोध घेतात. लास्झलो क्रॅस्नाहोर्कई खोलवर विचार करायला लावणाऱ्या, उदासीन कथा लिहितात. 1985 मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे ‘सातांटांगो’ हे पुस्तक जगभर प्रसिद्ध आहे. 1994 मध्ये या पुस्तकावर आधारित सात तासांचा चित्रपट निघाला. या चित्रपटाचे नाव ‘सातांटांगो’ असेच आहे. त्याची कथा एका लहान गावाच्या आणि तिथल्या लोकांच्या कठीण जीवनाभोवती फिरते. त्यात अराजकता, विश्वासघात आणि मानवी स्वभावातील कमकुवतपणा दर्शविला आहे. शिवाय, त्यांचे ‘द मेलॅन्कोली ऑफ रेझिस्टन्स’ या पुस्तकावरही चित्रपट बनवण्यात आला आहे.
भारतातर्फे अमिताव घोष होते स्पर्धेत
भारतातर्फे यंदाच्या साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी अमिताव घोष यांनी नामांकन सादर केले होते. ते या पुरस्काराचे एक प्रबळ दावेदार मानले जात होते. ऐतिहासिक कादंबऱ्या आणि पर्यावरणीय विषयांसाठी ओळखले जाणारे अमिताव घोष जागतिक लक्ष वेधून घेत होते. मात्र, इतर अनेक लेखकांच्या तीव्र स्पर्धेमुळे त्यांची निराशा झाली आहे. भारताला रवींद्रनाथ टागोर यांच्या माध्यमातून 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते. ‘गीतांजली’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. साहित्यातील नोबेल पुरस्कार जिंकणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय होते.









