मिलिटरी कॅम्पमध्ये अधिकाऱ्याच्या गणवेशात वावर
बेळगाव : लष्करी गणवेशात वावरणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन मल्लनगौडा बिरादार (वय 40) रा. नालतवाड ता. मुद्देबिहाळ जि. विजापूर असे त्याचे नाव आहे. मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मिलिटरी कॅम्प परिसरात हा युवक लष्करी गणवेशात फिरत होता. आपण वरिष्ठ अधिकारी आहोत असे सांगत वावरताना तो लष्करी अधिकाऱ्यांना सापडला. त्याची चौकशी केली असता तो तोतया निघाला. त्याच्याजवळ बनावट ओळखपत्रही सापडले आहे. लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात येऊन नागरिकांना ठकविण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडून कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्यावर एफआयआर दाखल करून न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
दोन वर्षांपासून होता फरार…
मल्लिकार्जुनवर याआधी कॅम्प पोलीस स्थानकात दोन एफआयआर दाखल झाले आहेत. केवळ बेळगावच नव्हेतर रायचूर, मंगळूर येथेही लष्करी अधिकाऱ्यांच्या गणवेशात वावरताना त्याला ताब्यात घेऊन एफआयआर दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून तो फरारी होता, अशी माहिती मिळाली आहे.









