अबकारी खात्याची अर्धवार्षिक उलाढालीची आकडेवारी : उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे खप कमी
बेळगाव : अबकारी खात्याच्या अर्धवार्षिक उलाढालीच्या आकडेवारीनुसार राज्यातील मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 2023-24 च्या तुलनेत मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे मद्याचा खप कमी झाला आहे. मात्र विक्रीत घट झाली असली तरीही दारूचे दर वाढले असल्याने अबकारी खात्याच्या महसुलावर कोणताही परिणाम झाला नाही. राज्य सरकारने पंचहमी योजना लागू केल्यापासून विशेष करून दारूवरील अबकारी शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यामुळेच दारूचे दर वाढले आहेत. यामुळेच दारू विक्रीत घट झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
पण यामुळे महसुलावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 352.83 लाख बॉक्स (एक बॉक्सात 8.64 लिटर) आयएमएल मद्याची विक्री झाली आहे. 2024 मध्ये याच कालावधीत 345.76 लाख बॉक्सांची विक्री घटली आहे. 2025 मध्ये 342.93 लाख बॉक्सांची विक्री झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2024 या कालावधीत एकूण 242.73 लाख बॉक्स (एक बॉक्समध्ये 7.80 लिटर) बिअरची विक्री झाली आहे. तर 2025 मध्ये याच कालावधीत 195.27 लाख बॉक्स बिअरची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 47.46 लाख बॉक्स कमी विक्री झाली आहे. एकंदरीत 19.55 टक्के विक्रीत घट झाली आहे. दर महिन्याला बिअरची विक्री होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
महसुलात 1869 कोटींनी वाढ
दारू विक्रीत घट झाली असली तरीही अबकारी खात्याने महसुलात मात्र प्रगती केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2024 पर्यंत दारू विक्रीतून 17,702 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. चालू वर्षाच्या याच कालावधीत दारू विक्रीत घट झाली असली तरी 19,571 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. महसुलात 1869 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.









