नेगिलयोगी रयत सेवा संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कित्तूर उत्सवासाठी यापूर्वी खर्च करण्यात आलेल्या निधीचा जाहीरपणे खुलासा करण्यात यावा, अशी मागणी नेगिलयोगी (नांगरधारी) रयत सेवा संघ बेळगाव जिल्हा शाखेने केली आहे. पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी (दि. 8) जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. 2025 मधील कित्तूर उत्सवासाठी राज्य सरकारने 5 कोटींचे अनुदान मंजूर केले असल्याचे पालकमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. ही बाब आनंदाची आहे. मात्र उत्सवातील उपक्रमांसाठी किती खर्च करण्यात येणार आहे. याचा तपशील देण्यात यावा. यापूर्वी झालेल्या कित्तूर उत्सवात उपक्रमांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र याचा तपशील जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे जनतेत संशय निर्माण झाला आहे. जनतेच्या पैशाचा सदुपयोग व्हावा, ही अपेक्षा ठेवून जनता खर्चाचा तपशील जाहीरपणे मांडण्याची मागणी करीत आहे.
तपशील जिल्हाधिकारी कार्यालयात मांडण्याची व्यवस्था करावी
कित्तूर उत्सवात विविध उपक्रमांसाठी खर्च करण्यात आलेल्या मागील निधीचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयात मांडण्याची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून जनतेतील गैरसमज दूर होईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना रवी पाटील, मनोहर सुळेभावीकर, भीमप्पा गुडची, हणमंत हुलमनी आदी उपस्थित होते.









