मुंबई हल्ला प्रकरणी पंतप्रधान मोदी यांचा घणाघात
वृत्तसंस्था / मुंबई
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर 2008 मध्ये हल्ला केल्यानंतर, त्यावेळच्या काँग्रेसप्रणित केंद्र सरकारने कोणाच्या सांगण्यावरुन पाकिस्तानवर कारवाई करण्याचे टाळले होते, हे सत्य आता काँग्रेसने उघड केलेच पाहिजे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते बुधवारी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी हे आव्हान दिले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी एक खळबळजनक विधान मुंबई हल्ल्याच्या संदर्भात केले होते. त्यावेळी पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची आमची इच्छा होती. त्यावेळचे नेते मनमोहनसिंग यांनीही तशी तयारी केली होती. तथापि, अमेरिकेने आमच्यावर दबाव आणला आणि आम्हाला कारवाई करण्याचा विचार सोडून द्यावा लागला, असे चिदंबरम यांचे विधान होते. या विधानामुळे मोठे राजकीय वादळ उठले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिदंबरम यांच्या त्या विधानाचा धागा पकडून काँग्रेसवर शरसंधान केले आहे. त्यावेळी मनमोहनसिंग यांना कारवाई करण्यापासून परावृत्त कोणी केले होते, हे आता काँग्रेसने स्पष्ट करावे. त्यावेळचे काँग्रेसचे नेतृत्व किती डरपोक होते, या चिदंबरम यांच्या विधानावरुन स्पष्ट होत आहे, अशा अर्थाचे विधानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केले आहे.
कोण विदेशी दबावाखाली आले होते…
चिदंबरम यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळचे नेते मनमोहनसिंग यांचीही पाकिस्ताचा बदला घेण्यास मान्यता होती. मग सरकारचे हात कोणी बांधून ठेवले होते ? विदेशी शक्तीच्या दबावाखाली येऊन कोणी पाकिस्तानविरोधात कारवाई रोखली होती ? सत्तेबाहेरचे सत्ताकेंद्र म्हणून त्यावेळी कोण काम करीत होते ? हे प्रश्न जनतेच्या मनात आहेत. त्यांचे उत्तर काँग्रेसने आता द्यावे. त्यावेळी दबावाखाली आल्याने पाकिस्तानवर कारवाई झाली नाही, हे उघड आहे. तेव्हा सरकारला रोखणारी व्यक्ती कोण होती, हे समजून घेण्याचा देशाला अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेसने विनाविलंब सर्व सत्य उघड करावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.









