बाइक दुर्घटनेत झाले होते गंभीर जखमी
वृत्तसंस्था/ मोहाली
पंजाबी गायक राजवीर जवंदा यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी राजवीर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाइक दुर्घटनेत जखमी जवंदा यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. 27 सप्टेंबर रोजी जवंदा यांचा पंचकूलाच्या पिंजौर येथे बीएमडब्ल्यू बाइक चालवताना अपघात झाला होता. जवंदा यांच्या पार्थिवावर गुरुवारी जगरांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दुर्घटनेत राजवीर जवंदा यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर ईजा झाली होती. 2014 मध्ये मुंडा लाइफ मी अल्बमद्वारे राजवीर यांनी स्वत:च्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. तर 2016 मध्ये कली जवंदे दी या गाण्यामुळे त्यांना ओळख मिळाली. 2017 मध्ये मुकाबली आणि कंगणी यासारखी त्यांची गाणी लोकप्रिय ठरली होती. यानंतर पटियाला शाही पेग, केसरी झंडे, लँडलॉर्ड, सरनेम समवेत अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली होती. 2018 मध्ये राजवीर यांनी पंजाबी चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जवंदा यांच निधनावर शोक व्यक्त केला आहे. राजवीर जवंदा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कळल्यावर मोठे दु:ख झाले. पंजाबी संगीतजगताचा तारा आम्ही गमावला आहे. कमी वयात स्वत:च्या गाण्यांद्वारे लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या राजवीर जवंदाचा आवाज नेहमीच आम्हा सर्वांसोबत राहणार असल्याचे मान यांनी म्हटले आहे.









