रशियाच्या सैन्याच्या वतीने होता लढत
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेन आणि रशिया यांच्यात 3 वर्षांपेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. याचदरम्यान रशियाच्या सैन्यासाठी युक्रेनच्या विरोधात लढणाऱ्या भारतीय नागरिकाला युक्रेनच्या सैन्याने पकडले आहे. या भारतीय नागरिकाचे नाव मोहम्मद हुसैन असून तो 22 वर्षांचा आहे. गुजरातच्या मोरबी येथील रहिवासी मजोती साहिल मोहम्मद हुसैनने युद्धभूमीवर केवळ 3 दिवस व्यतित केल्यावर युक्रेनच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे.
कीव्ह येथील भारतीय दूतावास आता याप्रकरणी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप याप्रकरणी कुठलीच औपचारिक माहिती युक्रेनकडून भारताला देण्यात आलेली नाही. हुसैर हा शिक्षणासाठी रशियात पोहोचला होता, परंतु नंतर अमली पदार्थाशी निगडित व्यापाराप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तुरुंगवासापासून वाचण्यासाठी तो युद्धात सामील झाला होता.
भारतीय नागरिकाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. युव्रेनच्या ब्रिगेडकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये हुसैन रशियन भाषेत बोलत असल्याचे दिसून येते. तुरुंगवासापासून वाचण्यासाठी रशियाच्या सैन्यात भरती झालो होतो. याचमुळे विशेष सैन्य अभियानासाठी एका करारावर स्वाक्षरी केली होती, असे हुसैनने मान्य केले आहे.
150 हून अधिक भारतीय रशियाच्या सैन्यात
रशियाच्या सैन्यात कार्यरत 27 भारतीयांची मुक्तता करणे आणि त्यांना मायदेशी परत पाठविण्यासाठी भारताने मॉस्कोवर दबाव टाकला होता. अधिकृत आकडेवारीनुसार 2022 मध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर 150 हून अधिक भारतीयांना रशियाच्या सैन्यात सामील करण्यात आले आहे.









