पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवणार युनूस
वृत्तसंस्था/ ढाका
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवत बांगलादेश चीनकडून जे-10सीई लढाऊ विमान खरेदी करण्याची तयारी करत आहे. बांगलादेश चीनकडून 2027 पर्यंत 20 जे-10सीई लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. हा व्यवहार जवळपास 2.20 अब्ज डॉलर्सचा असू शकतो. यात विमानांच्या खरेदीसोबत प्रशिक्षण, देखभाल आणि अन्य तांत्रिक खर्च सामील असतील.
या करारावर 2026-27 दरम्यान स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. तर देयकाची प्रक्रिया 2035-36 पर्यंत 10 वर्षांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. हा करार चीनच्या सरकारकडून थेट खरेदी किंवा जी2जी व्यवस्थेच्या अंतर्गत पूर्ण केला जाणार आहे. प्रत्येक विमानाची किमान किंमत 6 कोटी डॉलर्स असणार आहे, तर पूर्ण ताफ्याची किंमत जवळपास 1.2 अब्ज डॉलर्स असेल. याचबरोबर प्रशिक्षण, सुटेभाग, वाहतूक, विमा, कर आणि अन्य खर्चांना जोडल्यावर एकूण रक्कम 2.2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी चीन दौऱ्यादरमयन या विमानांच्या खरेदीवर चर्चा केली होती असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यात बांगलादेश सरकारने या क्यवहाराला अंतिम रुप देण्यासाठी एअर चीफ मार्शल हसन महमूद खान यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय आंतर-मंत्रालयीन समिती स्थापन केली होती, यात संरक्षण, अर्थ, कायदा आणि आर्थिक संबंध विभागांचे प्रतिनिधी सामील आहेत. जे-10सीई, चीनच्या जे-10सीचे निर्यात वर्जन असून ते पूर्वीपासून चीनच्या वायुदलात सामील आहेत. मे महिन्यात झालेल्या संघर्षादरम्यान भारतीय राफेल लढाऊ विमानाच्या विरोधात याच लढाऊ विमानाचा वापर केल्याचा दावा पाकिस्तान करत आहे.
बांगलादेश सरकारकडून स्थापन समिती कराराच्या अटींची समीक्षा करणार आहे. तसेच विमानांची खरेदी थेट चीन सरकारकडून करावी किंवा एखाद्या एजेन्सीच्या माध्यमातून याचा निर्णय घेणार आहे. बांगलादेश वायुदलाकडील विमानांची संख्या खूपच खालावली असल्याने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बांगलादेश वायुदल 212 विमानांचे संचालन करते, ज्यात 44 लढाऊ विमाने सामील असून यातील 36 चीनकडून निर्मित एफ-7 आहेत. याचबरोबर त्याच्याकडे केवळ 8 रशियन मिग-29 बी विमाने आहेत. अशास्थितीत बांगलादेश जे-10सीई लढाऊ विमाने खरेदी करत स्वत:च्या वायुदलाचे सामर्थ्य वाढवू पाहत आहे.









