ही स्वारस्यपूर्ण घटना चीनमधील शांघाय या शहरातील आहे. या शहरातील वांग नामक एक व्यक्ती सुटी घालविण्यासाठी सिंगूपरला निघाला. तो घरातून विमाततळावर आला आणि विमानात बसला. विमानाने आकाशात झेप घेतली. काही वेळानंतर वांग याच्या लक्षात एक महत्वाची बाब आली. तो घरातून निघताना त्याने गॅसवर अंडी उकडण्यास ठेवली होती. तथापि, तो गॅस बंद करण्यास विसरला होता. त्यामुळे गॅसची शेगडी तशीच धगधगत होती. आता परत जाऊन ती बंद करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याला चांगलीच चिंता वाटू लागली. कदाचित घराला आग लागण्याचीही शक्यता होती. शेवटचा उपाय म्हणून त्याने विमानातील कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार स्पष्ट केला. विमानाच्या चालकालाही या प्रकाराची माहिती देण्यात आली. काही काळ कोणालाच काय करायचे ते सुचत नव्हते. तथापि, नंतर चालकानेच यातून मार्ग काढला. यामुळे त्याचे कौतुक होत आहे. चालकाने वांग यांचा स्मार्ट कोड नंबर आणि त्याचा पत्ता नोंद करुन घेतला आणि शांघायच्या विमानतळावर ती माहिती कळविली. विमानतळ अधिकाऱ्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क करुन त्यांच्या कानावर ही घटना घातली.
पोलिसांनी त्वरित वांग याचे घर शोधून काढले आणि घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि गॅस बंद करुन पुढील संभाव्य गंभीर दुर्घटना टाळली. ही माहिती वांग याला कळविण्यात आली. तोपर्यंत तो सिंगापूरला पोहचला होता. धोका टळला आहे, हे समजताच तो निर्धास्त झाला. या सर्व प्रसंगात विमानाच्या चालकाची भूमिका महत्वाची होती. त्याने प्रसंगावधान राखून माहिती विमान तळावर पाठविली नसती, तर कदाचित मोठा अनर्थ होऊ शकला असता. सध्या ही घटना सोशल मिडियावर प्रसारित होत आहे. अनेकांनी ती पाहिली आहे. सर्वच लोक विमानचालकाच्या प्रसंगावधानाचे आणि त्याच्या वृत्तीचे कौतुक करीत आहेत.









