वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काऊआनाने वाचियर-लाग्रेव्हला शैलीदारपणे हरवून ग्रँड चेस टूर फायनल्स, 2025 जिंकली, तर अॅरोनियनने तिसरे स्थान पटकावले आणि प्रज्ञानंदने चौथ्या स्थानावर आपली मोहीम संपवली.
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने त्यासरशी 40,000 डॉलर्सची कमाई केली. तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात या 20 वर्षीय खेळाडूला अनुभवी ग्रँडमास्टर लेव्हॉन अॅरोनियनविऊद्ध कठीण परीक्षेचा सामना करावा लागला, जिथे आर्मेनियन स्टारने सलग तीन विजयांच्या वर्चस्वपूर्ण वाटचालीनंतर तीन गेम शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले. निकाल असा लागेलला असूनही प्रज्ञानंदची चार खेळाडूंच्या अंतिम फेरीसाठी पात्रता त्याच्या जलद प्रगतीला अधोरेखित करते. कारण तो जागतिक दर्जाची नावे असलेल्या ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआना, ग्रँडमास्टर मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह आणि अॅरोनियन यांच्यासोबत उभा राहिला आहे. या तिघांनी पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवत 2026 च्या ग्रँड चेस टूरमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
काऊआनाला जेतेपद मिळाले, ज्याने उल्लेखनीय पुनरागमन केले. पहिली गेम वाचियर-लाग्रेव्हने जिंकल्यानंतर अमेरिकन खेळाडूने सलग तीन विजय मिळवून नियंत्रण मिळवले. शेवटच्या गेममध्ये वाचियर-लाग्राव्हने जवळजवळ प्लेऑफमध्ये जाण्यास भाग पाडले होते, परंतु दबावाखाली झालेल्या त्याच्या चुकीमुळे काऊआनाला मुकुट आणि 1 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्सचे सर्वोच्च बक्षीस जिंकता आले. वाचियर लाग्रेव्हला 1 लाख अमेरिकी डॉलर्सवर समाधान मानावे लागले, तर अॅरोनियनला 60,000 डॉलर्स मिळाले.
सेंट लुईस चेस क्लब आता पुढील घडामोडींवर लक्ष केंद्रीत करून असून त्यात तीन स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. क्लच चेस : कास्पारोव्ह विऊद्ध आनंद (6 ते 11 ऑक्टोबर), यूएस चॅम्पियनशिप (11 ते 25 ऑक्टोबर), आणि क्लच चेस : कार्लसन, नाकामुरा, काऊआना आणि गुकेश (25 ते 30 ऑक्टोबर) यांचा त्यात समावेश आहे.









