पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी यांना टोमणा
वृत्तसंस्था / पाटणा
केंद्रीय निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला लाभ मिळावा, म्हणून मतांची चोरी करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपाचा खरपूस समाचार घेताना, राहुल गांधींवरच अप्रत्यक्षरित्या ‘चोरी’चा आरोप केला आहे. काही लोक बिहारचे सर्वमान्य नेते कर्पुरी ठाकूर यांना जनतेने दिलेला ‘जननायक’ हा पुरस्कार चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला त्यांनीं राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी बिहारमध्ये ‘जननायक कर्पुरी ठाकूर कौशल्य विकास विद्यापीठा’चा उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला आहे. या प्रसंगी त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर भाषण केले. कपुरी ठाकूर हे बिहारचे नेते स्वत:च्या कष्टांनी आणि जनसेवा करुन ‘जननायक’ पदाला पोहचले. त्यांना हे पद बिहारच्या कष्टकरी जनतेने दिले आहे. ते त्यांनी सोशल मिडियावर ट्रोलिंग करणाऱ्यांकडून मिळविलेले नाही, असाही घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. बिहारची जनता हे सर्व प्रयत्न हाणून पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बिहारमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे.
राजकीय पक्ष सज्ज
बिहारमध्ये येत्या काही आठवड्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीची जोरदार सज्जता केली आहे. ही निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्यात प्रामुख्याने होत आहे. सध्या या राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आहे. यावेळची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, अशी शक्यता आतापासूनच व्यक्त केली जात आहे.
लोकांनी सावध असावे
काही नेते बिहारची प्रतिष्ठा धोक्यात आणत आहेत. त्यांनी ‘जननायक’ हे पदही लाटण्याचा विचार चालविला आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेने अत्यंत सावध राहून विकासाच्या बाजूने आपला कौल द्यावा. लोकप्रिय नेत्यांची पदे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना त्यांनी खड्यासारखे दूर ठेवावे. या निवडणुकीत बिहारची सूज्ञ जनता पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच कौल देईल. पुन्हा ही आघाडीच सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.









