सामाजिक कार्यकर्ते-मनपाच्या पुढाकारातून अंत्यविधी
बेळगाव : रामलिंगखिंड गल्लीत रस्त्यावर अत्यवस्थ पडलेल्या एका गाईवर सामाजिक कार्यकर्ते व पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने औषधोपचार केले. मात्र त्याचा उपयोग न झाल्याने अखेर त्या गाईचा मृत्यू झाला. त्यामुळे महानगरपालिकेच्या पुढाकारातून त्या गाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामलिंगखिंड गल्लीत शुक्रवारी रस्त्याच्या मधोमध एक गाय बेशुद्ध होऊन पडल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते अवधुत तुडवेकर, संतोष दरेकर, वरुण कारखानीस यांच्यासह बावा संघटनेचे कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले. रस्त्यावर पडलेल्या गाईची परिस्थिती लक्षात घेऊन ही माहिती पशुसंगोपन खात्याच्या 1962 या क्रमाकांवर संपर्क साधून देण्यात आली. काही वेळातच पशुसंगोपन खात्याची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर सलाईन व इतर औषधोपचार केला. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्या गाईचा अखेर मृत्यू झाला. ही माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेला दिली. जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणून त्या गाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.









