दोन राज्यांमधील मृत्यूंनंतर केंद्र सरकारचा आदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ज्या मुलांचे वय दोन वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना खोकला झाल्यास कफ सायरप देऊ नका, असा आदेश केंद्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. हे सायरप अर्भकांसाठी कित्येकदा अयोग्य ठरते. त्याच्यामुळे मुलांची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे त्यांना अशी औषधे देण्याचा सल्ला दिला जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात अशा कफ सायरपमुळे पंधरा दिवसांमध्ये 9 अर्भकांचा मृत्यू झाला होता. काही प्रकारची कफ सायरप प्यायल्याने अर्भकांची मूत्रपिंडे अचानक निकामी झाली होती. त्यामुळे त्यांचा तत्काळ मृत्यू ओढवला होता. तर राजस्थानातही अशा सायरपच्या उपयोगाने दोन मुले मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना इशारा सूचना केली असून हा केंद सरकारचा आदेशच असल्याचे मानण्यात येत आहे.
भेसळयुक्त सायरप बाजारात
बाजारात अनेक भेसळयुक्त कफ सायरप उपलब्ध असून ती मुलांना दिल्यास त्यांच्या शरीराचे अवयय निकामी होऊ शकतात. तसेच मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मताने पालकांनी मुलांना कफ सायरप देऊ नयेत, असा इशारा या घटनांच्या पार्श्वभूमीवर तज्ञांनीही दिला आहे.
घातक रसायनांची भेसळ
कफ सायरपची चव वाढविण्यासाठी, तसेच ती स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्यात घातक रासायनिक पदार्थांची भेसळ केली जाते. या भेसळीमुळे अर्भकांना धोका निर्माण होऊ शकतो. मोठ्या माणसांवरही ही रसायने घातक परिणाम करु शकतात. त्यामुळे अशी भेसळ करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही अनेक ग्राहकहितैषी संघटनांनी केली आहे.









