धुकं’ या कथेला प्रथम क्रमांक
वेंगुर्ले (वार्ताहर)-
‘प्रबोधन गोरेगाव’ आणि ‘साप्ताहिक मार्मिक’ यांच्यातर्फे आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती कथास्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून डॉ. क्षमा संजय शेलार यांनी लिहिलेली ‘धुकं’ ही कथा १५ हजार रुपयांच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. प्रभाकर महादलिंग मठपती यांनी लिहिलेल्या ‘शेकडा पाच’ या कथेला दहा हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून सात हजार पाचशे रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार विनय दिलीप खंडागळे लिखित ‘टिचल्या बांगड्यांचं घर’ या कथेने पटकावला आहे. सौ. योगिनी श्रीनिवास पाळंदे (कथेचे शीर्षक : नवीन नाते), वेंगुर्ल्याचे कथा लेखक श्री प्रसाद अनंत खानोलकर (दुतोंडी अजगर) आणि डॉ. मोनाली हर्षे (अट्टाहास) या तीन कथाकारांच्या कथांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे. वेंगुर्ल्याच्याच सौ. प्राजक्ता प्रशांत आपटे यांनी लिहिलेली ‘नाटक’ ही सर्वोत्तम विनोदी कथा ठरली असून त्यांना पाच हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या या कथास्पर्धेत वेंगुर्ला येथील प्रसाद खानोलकर यांच्या कथेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते आणि यावर्षीच्या कथास्पर्धेत त्यांच्या कथेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तसेच वेंगुर्ल्यातीलच सौ प्राजक्ता प्रशांत आपटे यांच्या कथेला या स्पर्धेत सर्वोत्तम विनोदी पुरस्कार प्राप्त झाला आहे. धुकं ही प्रथम क्रमांकाची कथा साप्ताहिक मार्मिकच्या २०२५च्या दिवाळी अंकात प्रकाशित होणार असून अन्य सर्व पारितोषिक विजेत्या कथा मार्मिकच्या नियमित अंकांत क्रमश: प्रकाशित होणार आहेत. प्रबोधन गोरेगाव संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते, कट्टर शिवसैनिक व साहित्यसेवक असलेल्या स्व. वसंत तावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना नेते आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित झालेल्या या स्पर्धेला या दुसऱ्या वर्षीही लेखकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राबरोबरच गुजरात आणि कर्नाटकातूनही कथा प्राप्त झाल्या. एकूण १५० हुन अधिक सकस कथांमधून अंतिम निवड केली गेली. साप्ताहिक मार्मिक चे संपादक मुकेश माचकर, नामवंत विनोदी लेखक सॅबी परेरा आणि पत्रकार-लेखक-कवी विनोद पितळे यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रबोधनचे विजय नाडकर्णी यांनी कथांची प्राथमिक छाननी केली. प्रबोधन गोरेगाव संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित होणार असून त्या कार्यक्रमाची पूर्वसूचना सर्व स्पर्धकांना दिली जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.









