शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कोकण नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सुद्धा मागे राहिलेला नसून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने ‘एआय’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ वापरामध्ये आघाडी घेतली आहे. भारतातील पहिले ‘एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ बनण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या पूर्वी ई-ऑफिस प्रणाली वापरामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा नंबर-1 ठरला होता. आता एआय तंत्रज्ञानाच्या वापराने कोकण विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे
.स्वच्छता अभियान, पंचायतराज अभियान असो किंवा ई-ऑफिस कार्यप्रणाली, प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमात नेहमीच कोकण पुढे राहिलेलं आहे. आजवर पाहिले, तर कोकणातील गावे किंवा जिल्ह्यांनी राज्य नव्हे, तर देशपातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. ई-ऑफिस कार्यप्रणाली सुरू झाली, त्यावेळीही सिंधुदुर्ग जिल्हा हा ई-ऑफिस कार्यप्रणाली राबविणारा पहिला जिल्हा ठरला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खास सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन या ई-ऑफिस कार्यप्रणालीचे पहिले उद्घाटन केले होते व संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे कौतूक केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात आणि देशात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस कार्यप्रणाली राबविण्यात आली. या यशस्वीतेनंतर आता एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरामध्ये आघाडी घेत, सिंधुदुर्ग जिल्हा एआय मॉडेल ठरला आहे.
राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच व्यक्त केला होता. त्याचा शुभारंभ महाराष्ट्रातील कोकणातून सिंधुदुर्ग जिल्ह्याने केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर आहे. प्रशासनामध्ये एआयचा वापर प्रथम करण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या उपक्रमाची दखल केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून घेण्यात आली आहे. ही बाब सिंधुदुर्गसाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणसाठी गौरवास्पद ठरली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देत, विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेलचा अभ्यास करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे हे मॉडेल देशभरात स्वीकारले जाणार आहे. गौरवास्पद गोष्ट म्हणजे सर्वप्रथम एआय सिंधुदुर्ग मॉडेल बनण्याचा मान सिंधुदुर्गला मिळाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनात तातडीने तंत्रज्ञानाचा केलेला अंतर्भाव जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व घेऊन येणार आहे.
एआय मॉडेलमुळे जिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांचा अचूक व वेगवान आढावा घेता येणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र व सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ मिळणार आहे. भविष्यातील विकास आराखड्यासाठी डेटा आधारित निर्णय प्रक्रिया अधिक मजबूत होणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सिंधुदुर्ग जिल्ह्याने तयार केलेले हे मॉडेल आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले जाणार आहे. नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्गच्या भेटीत स्थानिक स्तरावरील अंमलबजावणीचा सखोल आढावा घेणार आहेत. या भेटीमुळे सिंधुदुर्गचा नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरात पोहोचणार आहे हे नक्की आहे. एआयमध्ये आगामी काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता आहे. हे एआयच्या विश्लेषणातून दिसून आलेले आहे. भारत मजबूत एआय शक्ती म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. आधार, यूपीआय, डिजिटल लॉकर, उमंग व इतर अनेक याची उदाहरणे आहेत. तसेच विविध संस्थांमध्ये बायोमेट्रिक, विविध संशोधने, महिला सुरक्षा या सारख्या क्षेत्रातही एआयचा वापर सुरू झालेला आहे. एआय विविध प्रकारे जनतेची सेवा करू शकते. विशेषत: ई-गव्हर्नन्स प्रकल्पामध्ये केंद्र व राज्य सरकार अनेक उपक्रम राबवित आहे.
शेतकऱ्यांसाठी सुद्धा एआय तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग होत असून शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती आणि योजनांचा लाभ या तंत्रज्ञानामुळे सुलभ आणि जलद गतीने मिळणार आहे. त्यासाठी प्रथम प्रशासनामध्ये या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याचा निश्चय सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. त्याला प्रशासकीय यंत्रणेकडून सुद्धा चांगले सहकार्य मिळत आहे. सिंधुदुर्गवासीयांचा विश्वास संपादित करत जिल्ह्यात एआय तंत्रज्ञान वापराचा शुभारंभ सुद्धा करण्यात आलेला आहे. पोलीस खात्यातील कामे अधिक सुटसुटीत बनली आहेत. परिवहन, आरोग्य व कृषी अशा सर्वच क्षेत्रात ही प्रणाली कार्यरत झाल्यामुळे जिल्हा प्रशासनातील कारभारामध्ये पारदर्शकपणा तर आलाच पण नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात प्रशासनाला यश येऊ लागले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा कृषी क्षेत्रात अधिक होत आहे. शेतकऱ्यांना कोणत्यावेळी कोणत्या साधनांचा वापर करायचा, त्यासाठी पिकांसाठी कोणता निर्णय घ्यायचा, कोणती रसायने किती प्रमाणात वापरायची हे समजू लागले आहे. मशागत करताना काय सुधारणा करायची, हवामानाचा अंदाज, मातीचे विश्लेषण, पाण्याचा वापर आणि कोणत्या प्रकारची बियाणे निवडायची, याबाबतची माहिती एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळत आहे.
शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला असताना या उपक्रमामध्ये सातत्य राखणे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. या जिल्ह्यात
ई-ऑफिस कार्यप्रणाली ज्यावेळी सुरू झाली, त्यावेळी प्रशासकीय कारभारात फार गतिमानता आली होती. परंतु, जसे अधिकारी बदलतात, तशी कार्यपद्धतीसुद्धा बदलली जाते. त्यामुळे काहीवेळा अधिकारी बदलल्यावर
ई-ऑफिस कार्यप्रणालीमध्ये शिथिलता आली होती. मात्र, या जिल्ह्यात आता पुन्हा एकदा ई-ऑफिस कार्यप्रणाली चांगल्या पद्धतीने सुरू झालेली असून आणि त्यामध्ये सातत्य दिसून येत आहे. त्याच पद्धतीने आता एआय तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सुद्धा सातत्य राहिल्यास जिल्ह्याच्या प्रशासकीय कारभारात आमुलाग्र बदल होऊ शकतो. जिल्ह्याबरोबरच राज्याच्या अर्थकारणातही बदल होऊ शकतो.
वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याला विरोध होण्याचाही संभव असतो. नव्वदीच्या दशकामध्ये भारतात संगणक क्रांतीची सुरुवात झाली. तेव्हा अनेकांनी त्यावर टीका-टिपण्णी केली होती. परंतु, पुढे जाऊन या संगणक क्रांतीचा जगभरात वापर झाला. आज संगणकाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा नव्या तंत्रज्ञानाच्या युगात वापरावाच लागणार आहे. याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्याने करून दिलेली आहे. एआय तंत्रज्ञान म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेला अनेक पैलू असतात. त्यामुळे बुद्धिमत्तेची व्याख्या एक-दोन वाक्यात करता येणार नाही. परंतु, मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठी प्रगती केली असून आगामी काळातही त्याहूनही वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा विकास होऊ शकतो आणि सर्वच क्षेत्रावर त्याचा प्रभाव दिसून येऊ शकतो. पुढील दशकामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर लक्षणीयरित्या वाढणार हे निश्चित आहे. एआयच्या वापराने प्रत्येक विद्यार्थ्याचे सामर्थ्य आणि दुर्बलता, अध्ययनातील गती याचा विचार करून शिक्षण देता येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनाची शैली आणि त्याला अवगत असलेले ज्ञान यावर आधारित शिकवणी आणि मदत देण्यास एआय उपयोगी ठरणार आहे. मूल्यांकनातून शिक्षकांना योग्य अभिप्राय मिळविण्यासाठी एआय लागू पडणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सुद्धा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये गतिमानता येणार असून कागदी घोडे नाचविण्याचे काम थांबणार आहे. सुसुत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी एआयचा चांगला वापर होणार आहे. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याने बनविलेले एआय तंत्रज्ञानाचे मॉडेल राज्य नव्हे, तर देशाला दिशादर्शक ठरून विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे.
संदीप गावडे








