बेळगाव : मलप्रभा साखर कारखाना निवडणुकीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली पुन:श्चेतन पॅनेलने भरघोस विजय मिळविला आहे. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार बाबासाहेब पाटील आदींच्या नेतृत्वात या पॅनेलमधून निवडणूक लढविलेल्या सर्व पंधरा उमेदवारांनी विजय संपादन केला असून विरोधी पॅनेलला धूळ चारली आहे. कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जसा लागत होता तशा कारखाना आवारासमोर विजयाच्या घोषणा देण्यात येत होत्या. याप्रसंगी मंत्री हेब्बाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांनी आम्हावर ठेवलेल्या विश्वासामुळेच विजय संपादन करणे आम्हाला शक्य झाले. त्यामुळे शेतकरी व कामगारवर्गाचे आम्ही ऋणी आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन कारखान्याचे कामकाज चालवणार आहोत, असे त्या म्हणाल्या. चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही कार्य करू.
निकाल पुढीलप्रमाणे
पुन:श्चेतन पॅनेल-चन्नराज हट्टीहोळी (4731), श्रीकांत इटगी (4424), शिवनगौडा पाटील (4349), शंकर किल्लेदार (4245), शैलेश तुरमुरी (4183), शिवपुत्रप्पा मरडी (3838), रघु पाटील (3829), रामनगौडा पाटील (3735), सुरेश हुलीकट्टी (3668), प्रवर्ग अ मतदारसंघातून-फकिराप्पा सक्रेन्नवर (4142), प्रवर्ग ब मधून-शंकरेप्पा होळी (4507), महिला मतदारसंघातून-ललिता पाटील (4041), सुनीता लंगोटी (3913), अनुसूचित जाती मतदारसंघातून-बाळप्पा पुजार (3827) व अनुसूचित जमाती मतदारसंघातून-भरमाप्पा शिगीहळ्ळी (4161) विजयी झाले आहेत.









