सीसीबी पोलिसांची कारवाई : दोन विदेशी नागरिकांसह 7 ड्रग्ज पेडलरना अटक
बेंगळूर : टपाल कार्यालयात विदेशातून आलेल्या पार्सलमध्ये आढळलेल्या 1 कोटी रुपये किमतीच्या हायड्रो गांजासह एकूण 9.93 कोटी रुपयांचे अमली पदार्थ बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी दोन विदेशी नागरिकांसह 7 ड्रग्ज पेडलरना अटक करण्यात आली आहे. टपाल कार्यालयात विदेशातून आलेल्या पार्सलविषयी संशय निर्माण झाल्याने ते उघडून पाहिले. त्यात 1.22 किलो हायड्रो गांजा व इतर वस्तू आढळून आल्या. सदर गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 1 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी के. जी. नगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे विभागाकडे (सीसीबी) सोपविण्यात आला आहे. बेंगळूर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वैद्यकीय व्हिसा व विद्यार्थी व्हिसा मिळवून नायजेरियातून बेंगळुरात आलेल्या दोन विद्यार्थ्यांनाही ड्रग्जविक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सीसीबी पोलिसांनी या विद्यार्थ्यांकडून 7.80 कोटी रु. किमतीचे 3 किलो 852 ग्रॅम एमडीएम क्रिस्टल व 41 ग्रॅम एक्सटासी गोळ्या जप्त केल्या. नायजेरियातील केवीन रॉजर व थॉमस नावीद अशी आरोपींची नावे आहेत. 2019 मध्ये वैद्यकीय व्हिसा मिळवून दिल्लीत आलेला विदेशी नागरीक बेंगळूरला ड्रग्ज आणून बेंगळूरमध्ये ओळख असणाऱ्यांना विक्री करत होता. त्याच्याविरुद्ध 2023 मध्ये अमली पदार्थ नियंत्रण विरोधी पथकाने गुन्हा नोंदविला होता. त्याची जामीनावर सुटका झाली होती. आणखी एन नायजेरिन नागरीक 2019 मध्ये विद्यार्थी व्हिसा मिळवून भारतात आला होता. ऑनलाईनच्या माध्यमातून तो फसवणूक करत होता. त्याच्याविरुद्ध गुजरातच्या सायबर गुन्हे विभागात दोन गुन्हे नोंद आहेत. न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर तो दिल्लीत फरार झाला होता. दोन आठवड्यापूर्वी बेंगळूरला येऊन ड्रग्ज विक्रीत गुंतला होता. केरळमध्ये कमी किमतीत हायड्रो गांजा खरेदी करून बेंगळूरमध्ये विक्री करत असताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 75 लाख रुपये किमतीचा 500 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला.









