7,135 मीटर उंचीवर चढाई करत रचला इतिहास : आता माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्यावर नजर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडो-तिबेटी सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) 14 गिर्यारोहकांच्या एका पथकातील शूर महिलांनी लडाखमधील 7,135 मीटर उंचीवरील ‘माउंट नन’ जिंकून एक नवा विक्रम रचला. आता त्यांचे पुढील ध्येय जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट (8,848 मीटर) जिंकणे असल्याचे सांगण्यात आले.
‘माउंट नन’ या ऐतिहासिक गिर्यारोहणाचे नेतृत्व असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) भावनाता यांनी केले. आयटीबीपी मुख्यालयाकडून सर्व महिलांचा संघ तयार करण्याचे आदेश मिळाले होते. यासाठी 18 ते 35 वयोगटातील महिलांची निवड करण्यात आली होती. त्यांनी प्रगत गिर्यारोहण अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
गिर्यारोहणासाठी पथकाची निवड केल्यानंतर आम्ही लेह-कारगिलला गेलो. आमच्या महिलांनी 15 दिवसांच्या कठीण प्रवासात त्यांच्या चिकाटी आणि दृढ निश्चयाच्या जोरावर हे यश मिळवले, असे पथकाच्या प्रमुख भावनाता यांनी सांगितले. आता नजिकच्या काळात आमी माउंट एव्हरेस्टचा विचार करत असून आम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आमची टीम तरुण आणि तंदुरुस्त आहे. आम्ही प्रशिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करू आणि निश्चितच आमचे ध्येय साध्य करू, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
‘माउंट नन’वरील मोहिमेदरम्यान पथकाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कडाक्याची थंडी, आजारपण, उंच बर्फाच्छादित पर्वत चढणे, हिमनद्या आणि खोल दरींनी भरलेले कठीण भूभाग, प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण आणि अप्रत्याशित प्रतिकूल हवामान अशा अनेक समस्यांवर मात करत महिला कमांडोंनी धैर्य, शिस्त आणि टीमवर्कद्वारे यश मिळवले.
…आता एव्हरेस्ट चढाईचे लक्ष्य!
ही कामगिरी केवळ आयटीबीपीच्या परंपरेलाच पुढे नेत नाही तर महिला सक्षमीकरणाचे प्रतीक देखील आहे. आता गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार आयटीबीपीच्या महिला कमांडोंचे पथक पुढील तीन वर्षे दरवर्षी एव्हरेस्ट चढतील. पहिल्यांदाच महिला पथकाला संधी मिळत असली तरी हे उद्दिष्टही साध्य होईल.
– राहुल रसगोत्रा, आयटीबीपी महासंचालक









