वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या शेजारचा देश आणि भारताचा मित्र असणारा भूतान आता भारताशी रेल्वेने जोडला जाणार आहे. भारताने दोन नव्या रेल्वेमार्गांची घोषणा या संदर्भात केली आहे. कोक्राझार-गेलेफू आणि बनारहाट-सामत्से असे हे दोन रेल्वेमार्ग आहेत. या दोन्ही प्रकल्पांना एकंदर 4 हजार 33 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पांची घोषणा केली आहे.
भारत आणि भूतान यांच्या रेल्वेने जोडण्याची एक महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आली आहे. सोमवारी घोषणा करण्यात आलेले दोन प्रकल्प या व्यापक योजनेचा एक भाग आहेत. हे या दोन्ही देशांमधील संयुक्त प्रकल्प असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्यात या प्रकल्पासंबधीच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भूतान हे सर्व बाजूंनी भूमीने वेढलेले राज्य आहे. त्यामुळे ते आपल्या व्यापारासाठी भारताच्या साहाय्यावर निर्भर आहे. भारतानेही या देशाला आजवर हे साहाय्य देऊ केले आहे. दोन्ही देशांना रेल्वेने जोडण्याचे हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार अधिक वाढणार आहे. तसेच भूतानलाही इतर देशांशी व्यापार करताना या रेल्वेचा लाभ उठविता येणार आहे. या प्रकल्पांमुळे भूतानला भारताच्या दीड लाख किलोमीटर लांबीच्या रेल्वे जाळ्याशी स्वत:ला जोडून घेता येणार आहे. हे दोन्ही प्रकल्प अनुक्रमे येत्या चार आणि तीन वर्षांमध्ये पूर्ण केले जाणार असून त्यांच्यामुळे हे दोन देश एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत.









