रशियाकडून तोंड भरुन प्रशंसा
► वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
भारत हा एक स्वाभिमानी देश आहे. तो स्वत:चे निर्णय स्वत: घेत आहे, अशा शब्दांमध्ये रशियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भारताचे कौतुक केले आहे. भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी बंद करावी, यासाठी काही देशांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही भारताने आमच्या तेलाची खरेदी थांबविलेली नाही. भारताच्या या कृतीवरुन भारत दबावात येऊ शकत नाही, हे सिद्ध होत आहे, अशी भलावण रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी केली आहे. संयुक्त राष्टसंघात भाषण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अमेरिकेचे तेल भारताने खरेदी करावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारत यासंदर्भात अमेरिकेशी चर्चा करण्यात सज्ज आहे. मात्र, कच्चे इंधन तेल ही भारताची आवश्यकता आहे. आमच्या 140 कोटी लोकांच्या ऊर्जा सुरक्षेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या देशाकडून तेलखरेदी करावी, हा निर्णय आम्हाला आमची देशांतर्गत परिस्थिती पाहून घ्यावा लागतो. हे सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही अमेरिकेकडून तेल खरेती न करता अन्य देशांकडून केली, तरी भारत आणि अमेरिका संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे विधान नुकतेच भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले होते. रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी या विधानाचे पूर्णत: समर्थन केले.
अमेरिकेची इच्छा असेल तर…
अमेरिका भारताशी व्यापारासंबंधी किंवा तेलाच्या विक्रीसंबंधी जर व्यवहार करु इच्छित असेल आणि त्यासाठी अमेरिका काही प्रस्ताव देणार असेल, तर माझ्या माहितीनुसार भारत निश्चितच अमेरिकेशी चर्चा करेल. तथापि, संरक्षण, गुंतवणूक, व्यापार, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये भारत इतर देशांशी व्यवहार करणार असेल, तर तो त्याच देशांशी चर्चा करेल. कारण, भारत स्वतंत्रपणे आपले निर्णय घेत असतो, अशीही टिप्पणी लाव्हरोव्ह यांनी त्यांच्या भाषणात आणि पत्रकार परिषदेत केली.
स्वतंत्र धोरणाचा सन्मान
भारताने नेहमीच आपले निर्णय स्बबळावर आणि स्वतंत्रपणे घेण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे तो दबावात येत नाही. रशिया भारताच्या या स्वतंत्र धोरणचा आदर करतो. भारताचे रशियाशी अनेक दशकांपासूनचे संबंध आहेत. हे संबंध पुढेही राहणार आहेत. भारत अन्य देशांशी कसे संबंध ठेवतो, यावर आमचे भारताशी असलेले संबंध अवलंबून नाहीत, असेही प्रतिपादन लाव्हरोव्ह यांनी केले.









