देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : स्वदेशी 4 जी प्रणालीमुळे गावे जोडली जाणार असल्याचा विश्वास
पुणे / प्रतिनिधी
स्वदेशी 4-जी प्रणालीद्वारे अनेक गावे एकमेकांशी जोडली जाणार असून, यातून देशातील खेड्यापाड्यातील जनता जगाशी संपर्क साधू शकणार आहे. या प्रणालीच्या वापराद्वारे आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग-व्यवसाय अशा विविध व्यवस्थांशी एका क्लिकवर संपर्क साधता येणार आहे. स्वदेशीचा नारा देत विकसित भारताचे स्वप्न बघताना हे आधुनिक तंत्रज्ञान मोठी क्रांती घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. राज्य सरकारने लवकरच अकराशे सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाअंतर्गत देशात विकसित करण्यात आलेल्या बीएसएनएल 4-जी तंत्रज्ञानाचा प्रारंभ ओडिशा राज्यातील झारगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. तर महाराष्ट्रातील या सेवेचा प्रारंभ पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, की देशासमोर जेव्हा केव्हा आव्हाने उभी राहिली किंवा देशावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तंत्रज्ञान, तेज, कर्तव्यता एकत्रित करून देशाने जगाला समर्थपणे उत्तर दिले आहे. या निर्मितीमुळे संपूर्ण स्वदेशी प्रणाली विकसित करणारा भारत हा जगाच्या पाठीवरील पाचवा देश बनला आहे. विकसित भारत ही संकल्पना साकार करण्यासाठी बीएसएनएलच्या शुद्ध 100 टक्के स्वदेशी बनावटीच्या 4-जी प्रणालीचा मोठा हातभार लागणार आहे. राज्य सरकार लवकरच अकराशे सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देणार असून, या सेवा कार्यान्वित होण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे व याचा उपयोग खेड्यापाड्यातील आदिवासी भागातील नागरिकांना होणार आहे.
भारत नावाच्या शक्तीची उंच झेप : एकनाथ शिंदे
शिंदे म्हणाले, की या प्रणालीचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. देशाची वाटचाल सक्षमतेकडे होत असून, विकास आणि ज्ञानाच्या यज्ञात महाराष्ट्र मागे राहणार नाही.
सुरक्षिततेचीही जपणूक : रक्षा खडसे
खडसे म्हणाल्या, की स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानामुळे देशाची सुरक्षितताही जपली जाणार आहे. बीएसएनएलने केवळ 22 महिन्यांमध्ये हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.








