वृत्तसंस्था /बिजिंग (चीन)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या चायना खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉपसिडेड इगा स्वायटेकने एकेरीची तिसरी फेरी गाठताना चीनच्या युईचा पराभव केला.
डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धांमध्ये सलग तीन टेनिस हंगामात 25 किंवा त्याहून अधिक विजय नोंदविणारी स्वायटेक ही पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे. टॉपसिडेड स्वायटेकने गेल्या आठवड्यात सेऊल येथे कोरिया खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. तसेच तिने आतापर्यंत चारवेळा फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि एकदा अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्यात स्वायटेकने युईचा 6-0, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. दुसऱ्या फेरीतील अन्य सामन्यात चौथ्या मानांकीत रशियाच्या मीरा अँड्रीव्हाने चीनच्या लिनचा 6-2, 6-2, अमेरिकेच्या नेव्हारोने रुसेचा 6-3, 7-6 (7-0) असा पराभव केला. तसेच पुरूषांच्या विभागात इटलीच्या जेनिक सिनरने फ्रान्सच्या अॅटमेनीचा 6-4, 5-7, 6-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.









