► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अंदमान बेटांजवळच्या भारताच्या कार्यक्षेत्रातील समुद्रात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक इंधन वायूचे साठे आढळले आहेत, अशी विश्वसनीय माहिती देण्यात आली आहे. या समुद्राच्या एका उथळ विभागात हे साठे असल्याचे ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ नामक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने स्पष्ट केले आहे. ओपन एकरेज लायसेन्ंिसंग पॉलीसी’ (ओएएलपी) च्या अंतर्गत या कंपनीला भारत सरकारने येथे तेल आणि नैसर्गिक वायूचे संशोधक करण्याचे अनुमतीपत्र दिले असून या कंपनीने येथे मोठ्या प्रमाणात शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. या कंपनीने या क्षेत्रात एक तेलविहिर खोदली असून या विहीरीतून वायू बाहेर पडण्यास प्रारंभ झाल्याने समाधानाचें वातावरण निर्माण झाले आहे. विहीरीतून वायू बाहेर पडणे, याचा अर्थ या क्षेत्रात नैसर्गिक इंधन वायूचे भांडार आहे, असा काढला जात आहे.
प्रथमच यश
अंदमान समुद्रात इंधनाचा शोध लागण्याचा हा प्रथमच यशस्वी प्रयत्न ठरला आहे. ही कंपनी या क्षेत्राच्या 10 हजार चौरस किलोमीटर भागात तेल आणि वायूचे संशोधन करीत आहे. कंपनीला यशही मिळत आहे. आसाम, राजस्थान, महानदी आणि अंदमान ही भारताची संभाव्य तेलक्षेत्रे म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे.









