कंग्राळी खुर्द येथे दौडमुळे भगवेमय वातावरण
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द येथे नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर सोमवारपासून मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे पूजन शस्त्रपूजन, दुर्गामाता मूर्तीचे पूजन, ध्वज पूजन मान्यवर व धारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. दुर्गामाता दौड व नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भगवे ध्वज व पताकांनी सारा परिसर भगवेमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दौडीमध्ये शाळकरी मुलांबरोबर बालचमू व तरुणांचा धारकऱ्यांचा व शिवभक्तांचा सहभाग असल्याचे दिसून आले. दौडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शूरवीर गीतांचा जागर करण्यात आला. प्रारंभी प्रेरणामंत्र व आरती म्हणून ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आला. दौड संपूर्ण गावभर फिरुन झाल्यावर ध्येय मंत्राने दौडची सांगता करण्यात आली.









