वार्ताहर /हिंडलगा
आंबेवाडी येथे दुर्गामाता दौडला घटस्थापनेपासून उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे 6 वाजता दररोज श्री दुर्गामातामूर्तीचे पूजन करून दौडीला प्रारंभ होत आहे. गावातील रामदेव गल्ली, घळगेश्वर गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली नवीन गल्ली या सर्व भागातून दौड काढली जात आहे. दौडीचे औचित्य साधून गावातील सर्व मंडळांनी भगव्या पताका लावून सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण केले आहे. गावातील सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी व स्वागत फलक लावून दुर्गादौडीचे स्वागत केले जात आहे. मंदिरांच्या ठिकाणी सुवासिनी महिला निरांजन ओवाळून भगव्या ध्वजाचे पूजन करत आहेत. दौडीत बालगोपाळांचा मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभाग झाला आहे. दौडीची सांगता घळगेश्वर मंदिराच्या ठिकाणी होत आहे.









