वृत्तसंस्था/दुबई
गेल्या रविवारी येथे झालेल्या आशिया चषक सुपर 4 सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी केलेल्या चिथावणीखोर हावभावांबद्दल भारताने आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विश्वसनीय माहितीनुसार, बीसीसीआयने बुधवारी या दोघांविऊद्ध तक्रार दाखल केली आहे आणि आयसीसीला हा ई-मेल मिळाला आहे. जर साहिबजादा आणि रौफ यांनी हे आरोप लेखी स्वरूपात नाकारले, तर आयसीसीकडून सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. सुनावणीसाठी त्यांना आयसीसी एलिट पॅनलचे पंच रिची रिचर्डसन यांच्यासमोर हजर राहावे लागू शकते.
प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांप्रती पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या भारतीय सशस्त्र दलांना आपल्या संघाचा विजय समर्पित केल्याबद्दल भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याविऊद्ध आंतरराष्ट्रीय मंडळाकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. 14 सप्टेंबरच्या सामन्यानंतर सूर्यकुमारची ही टिप्पणी आली होती. पीसीबीचा आरोप आहे की, सूर्याचे हे वक्तव्य राजकीय आहे, परंतु तांत्रिकदृष्ट्या पीसीबीने नेमकी कधी तक्रार दाखल केली हे पाहणे आवश्यक आहे. कारण टिप्पणीच्या सात दिवसांच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.
21 सप्टेंबरच्या सामन्यादरम्यान रौफने विमान पाडल्याचे हावभाव केले होते आणि भारताच्या लष्करी कारवाईची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. 2022 मधील टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान भारतीय दिग्गज खेळाडू विराट कोहलीने एमसीजीवर रौफला खेचलेल्या आणि सामना जिंकून देणाऱ्या षटकारांचा संदर्भ देऊन भारतीय समर्थकांनी ‘कोहली, कोहली’ अशी घोषणाबाजी केल्यानंतर त्याने हे हावभाव केले होते. याशिवाय त्याने भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना त्याच्या गोलंदाजीच्या स्पेलदरम्यान अर्वाच्य भाषा वापरली होती आणि दोन्ही तऊणांनी त्यांच्या बॅटने त्यास प्रत्युत्तर दिले होते.
त्याच सामन्यादरम्यान साहिबजादाने त्याच्या बॅटचा मशीन गनसारखा वापर करून गोळीबाराचा हावभाव करत अर्धशतकाचा आनंद साजरा केला होता, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. रौफ आणि साहिबजादा या दोघांनाही आयसीसीच्या सुनावणीत याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि जर ते बाजू पटवून देऊ शकले नाहीत, तर त्यांना आचारसंहितेनुसार दंड होऊ शकतो.
मोहसीन नक्वीकडून आगीत तेल ओतण्याचा प्रकार
आगीत तेल ओतताना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी बुधवारी ’एक्स’वर क्रिस्तियानो रोनाल्डोचा स्लो-मोशन व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू अचानक विमान कोसळल्यागत हावभाव करताना दिसतो. गेल्या रविवारी भारताविरुद्ध मैदानावर जे प्रकार घडले त्याच्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न या नजरेतून या पोस्टकडे पाहिले जाते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष असण्याव्यतिरिक्त नक्वी पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत आणि भारताविऊद्ध भडकाऊ विधाने करण्यासाठी ओळखले जातात. व्हिडिओमध्ये रोनाल्डोने केलेले हावभाव हा कदाचित त्याचा फ्री-किक गोलमध्ये कशी घुसली हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो. या प्रकारानंतर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेला भारतीय संघ एसीसी अध्यक्षांसोबत व्यासपीठावर येतो की नाही हे पाहावे लागेल. बीसीसीआय आणि आयसीसीच्या अधिकाऱ्यांकडूनही ही बाब दुर्लक्षित राहिलेली नाही. नक्वींवर काही कारवाई होईल की नाही हे पाहावे लागेल.









