झेलेन्स्की यांचा पुतिन यांना निर्वाणीचा इशारा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्वरित युद्ध थांबवा, किंवा आमच्याकडून तडाखे सोसा, असा शब्दांमध्ये त्यांनी पुतिन यांना संदेश पाठविला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या संयुक्त राष्ट्रसंघात पेलेल्या भाषणात, युक्रेन हे युद्ध जिंकू शकेल, असे प्रतिपादन केले होते. त्यामुळे झेलेन्स्की यांचा उत्साह वाढला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी निर्वाणीची भाषा केली आहे. रशियाने युद्ध थांबविले नाही, तर आम्ही त्यांच्यावर इतका बाँब वर्षाव करु की त्यांना बाँब शेल्टर्समध्ये आश्रयासाठी जावे लागेल. बाँब शेल्टर या शब्दाचा अर्थ त्यांना कळतो, अशी माझी समजूत आहे. त्यामुळे त्यांनी वेळीच सावध व्हावे आणि आपला स्वत:चा अनर्थ टाळावा, अशा अर्थाची खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
अमेरिका करणार साहाय्य
रशिया विरुद्धच्या युद्धात अमेरिकेने आमचे समर्थन केले आहे. अमेरिका आम्हाला आवश्यक ती युद्धसामग्री पुरविणार आहे. या सामग्रीत दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचाही समावेश असेल. आम्ही ही क्षेपणास्त्रे रशियाच्या विरोधात उपयोगात आणणार आहोत. आम्ही रशियाच्या तेलशुद्धीकरण केंद्रांवर आणि शस्त्रास्त्रांच्या कारखान्यांवर हल्ले करणार आहोत. आम्हाला अमेरिकेने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे, असे प्रतिपादनही झेलेन्स्की यांनी गुरुवारी रशियाला उद्देशून केले आहे.









