बसवेश्वर चौकात एक तास रास्तारोको आंदोलन : वाहतूक ठप्प झाल्याने गैरसोय
खानापूर : कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने राज्यांमध्ये विकासात्मक कामासाठी अनुदान मंजूर करताना भेदभाव सुरू केला असून, भाजपाचे ज्या ठिकाणी आमदार आहेत. त्या ठिकाणी रस्ते व विकासात्मक कामासाठी अनुदान मंजूर करताना भेदभाव सुरू केला आहे. भाजपाने राज्यभर निषेध आणि निदर्शने आयोजित केली होती. त्याचाच एक भाग म्हणून तालुका भाजपच्यावतीने अध्यक्ष बसवराज सानीकोप यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वर चौकात एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सुरुवातीला भाजपाचे सेक्रेटरी मल्लाप्पा मारिहाळ यांनी प्रास्ताविक व आंदोलनाची रुपरेषा सांगितली व विकासनिधी देताना भेदभाव करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध केला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी बोलताना म्हणाले, राज्यातील सिद्धरामय्या सरकारने जातीभेद करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. सरकार दिवाळखोरीत निघाल्याने खानापूरसह संपूर्ण राज्यातील रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. अनुदान मंजूर करताना भेदभाव करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारने विकासासाठी अनुदान मंजूर करावे म्हणून रास्तारोको आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध
अॅड. चेतन मणेरीकर म्हणाले, सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला. अनुदान मंजूर नसल्याने रस्ते खराब होते आहेत. खराब रस्त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. याला सर्वस्व काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. संजय कुबल म्हणाले, काँग्रेस सरकारच्या अशा धोरणामुळे राज्यातील विकास खुंटलेला आहे. तसेच तालुका दुर्गंम असल्याने तालुक्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. सरकारने तातडीने विकासासाठी निधी मंजूर करावा. यावेळी पंडित ओगले, तालुकाध्यक्ष बसवराज सानिकोप यासह अनेकांची सरकारचा निषेध करणारी भाषणे झाली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते बाबुराव देसाई, माजी सभापती सयाजी देसाई, चांगाप्पा निलजकर, सुंदर कुलकर्णी, तालुकाध्यक्ष किशोर हेब्बाळकर, प्रकाश तीरवीर, सदानंद मासेकर, सुनील मडीमणी, अशोक देसाई, संजय कंची तसेच आदी नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.









