बांगलादेशवर 41 धावांनी विजय : सामनावीर अभिषेक शर्माचे वेगवान अर्धशतक
वृत्तसंस्था/ दुबई
आशिया चषक स्पर्धेतील सलग पाचव्या विजयासह टीम इंडियाने फायनल गाठली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने बांगलादेशसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 127 धावांवर आटोपला. टीम इंडियाने 41 धावांनी विजय नोंदवत फायलमध्ये धडक मारली. आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील लढतीला सेमीचे स्वरुप आले आहे. यातील विजयी संघ 28 सप्टेंबरला टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळताना दिसेल.
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर तंजिद हसनला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर सलामीवीर सैफ हसनने एका बाजूने दमदार अर्धशतक झळकवले. पण दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. सैफने 51 चेंडूत 69 धावांची खेळी केली. याशिवाय, परवेज हुसेनने 21 धावांचे योगदान दिले. बांगलादेशच्या अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, बुमराह आणि चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 तर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा याने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा सलग पाचवा विजय
दुबईत झालेल्या सामन्यात प्रारंभी, बांगलादेशचा प्रभारी कर्णधार जाकेर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या गोलंदाजांनी पहिल्या तीन षटकात अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना फार मोठे फटके खेळू दिले नव्हते. मात्र त्यानंतरच्या तीन षटकात गिल आणि अभिषेकने तुफानी फटकेबाजी केली. पॉवरप्लेच्या 6 षटकात भारताने बिनबाद 72 धावा केल्या होत्या. पण त्यांची ही भागीदारी रिषाद हुसैनने 7 व्या षटकात शुभमन गिलला तान्झिद हसन साकिबच्या हातून झेलबाद करत तोडली. गिलने 19 चेंडूत 29 धावा केल्या.
अभिषेकचे सलग दुसरे अर्धशतक
शुभमन बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेलाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 2 धावांवर तो बाद झाला. यानंतर अभिषेकने मात्र आपला आक्रमक खेळीचा तडाखा कायम ठेवत 25 चेंडूत अर्धशतकही केले. मात्र 12 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धाव घेताना गोंधळ झाला. या गोंधळात अभिषेकची विकेट गेली. त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 75 धावांचे योगदान दिले. त्यानंतर सूर्यकुमार यादव (5) आणि तिलक वर्मा (5) हे देखील स्वतात बाद झाले. लागोपाठ तीन विकेट्स गेल्यामुळे धावगती मंदावली होती. यातच हार्दिक पंड्याने शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी केल्यामुळे टीम इंडियाला 6 बाद 168 धावापर्यंत मजल मारता आली. हार्दिकने 29 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 38 धावा फटकावल्या. अक्षर पटेल 10 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना रिषाद हुसैनने 2 विकेट्स घेतल्या.
अभिषेकने मोडला युवराजचा विक्रम
अभिषेकने बांगलादेशविरुद्ध लढतीत 25 चेंडूत अर्धशतक केल्याने तो भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत 50 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अभिषेकने पाचव्यांदा 25 चेंडूंच्या आत 50 धावा केल्या. त्यामुळे त्याने युवराज सिंगला मागे टाकले आहे. युवराजने 4 वेळा भारतासाठी टी-20 मध्ये 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. सूर्यकुमारने 7 वेळा, तर रोहित शर्माने 6 वेळा असा कारनामा केला आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 6 बाद 168 (अभिषेक शर्मा 37 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारासह 75, शुभमन गिल 29, शिवम दुबे 2, सूर्यकुमार यादव 5, हार्दिक पंड्या 38, तिलक वर्मा 5, अक्षर पटेल नाबाद 10, रिशाद हुसेन 2 बळी, सैफुद्दिन, मुस्तफिजूर रेहमान आणि तंजिम हसन प्रत्येकी 1 बळी)
बांगलादेश 19.3 षटकांत सर्वबाद 127 (सैफ हसन 69, परवेज हुसेन 21, कुलदीप यादव 3 बळी, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती प्रत्येकी 2 बळी).









