बेळगाव : व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने देशभरातील विविध समाज बेळगावमध्ये स्थायिक झाले. त्यातीलच उत्तर प्रदेश येथील नागरिक मागील 21 वर्षांपासून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करीत आहेत. यावर्षीही मोठ्या उत्साहात दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्तर भारतीय नागरिकांनी केले आहे. सदाशिवनगर येथील हरिद्रा गणेश मंदिरात उत्तर प्रदेश येथील नागरिकांनी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली आहे. यावर्षी त्यांचे 21 वे वर्ष आहे. यापूर्वी ते आंबेडकर भवन परिसरात दुर्गादेवीचे पूजन करीत होते. परंतु त्या ठिकाणी जागा अपुरी पडल्याने आता सदाशिवनगर येथे प्रतिष्ठापना करीत आहेत. विजयादशमीपर्यंत मनोभावे पूजन करून हत्तरगी येथील नदीमध्ये दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
नाविन्यपूर्ण दुर्गादेवीची मूर्ती
ज्या प्रकारे उत्तर भारतात दुर्गादेवीची मूर्ती बनविली जाते, त्याच प्रकारे उत्तर प्रदेशमधील हे नागरिक मूर्ती अनगोळ येथून बनवून घेतात. दुर्गादेवीसोबत गणपती, तसेच इतर मूर्तींचीदेखील प्रतिष्ठापना होते. पारंपरिक पद्धतीने लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. इतर समाजही यामध्ये सहभागी होत आहेत. बेळगावमध्ये काही ठिकाणी बंगाली बांधवांकडूनही दुर्गामूर्तीचे पूजन केले जाते.









