तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सध्या जलद गतीने सुरू
By : महेश तिरवडे
राधानगरी : राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे येत्या 10 ते 15 दिवसांत हे कार्यालय एस.टी.स्टॅण्डजवळील बीएसएनएल इमारतीत स्थलांतरित होणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या नवीन इमारतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामध्ये प्रथम टप्प्यात १६ कोटी तर उर्वरित कामांसाठी ६ कोटी रुपयांचा समावेश आहे. हे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, लवकरच नागरिकांना नवीन सुविधांसह सेवा मिळणार आहेत.
सध्या जुन्या इमारतीत महसूल, संजय गांधी योजना विभाग, निवडणूक शाखा, कोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक, पुरवठा व उपकार्यालये आदी विविध विभागांचे स्थलांतर सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यापासून हे काम गतीने सुरू आहे. तालुक्यातील रेकॉर्ड गठ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गावनिहाय अभिलेखांची नक्कल काढण्यासाठी काहीसा कालावधी लागणार आहे.
त्यामुळे नागरिकांना काही दिवस नक्कल मिळण्यास विलंब होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या इमारतीत कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, जुन्या इमारतीच्या परिसरातील ई-सेवा केंद्र, झेरॉक्स दुकाने, स्टॅम्प विक्रेते, हॉटेल व इतर व्यावसायिकही हळूहळू स्थलांतरित होत आहेत. महसूल विभागाने तालुक्यातील नागरिकांनी सुरू असलेल्या स्थलांतर प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.








