वृत्तसंस्था/ अबुधाबी
सुपर 4 टप्प्यातील सुऊवातीच्या पराभवातून सावरलेले श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोघेही आज मंगळवारी जेव्हा येथे आमनेसामने येतील तेव्हा आशिया चषक स्पर्धेच्या या महत्त्वाच्या टप्प्यात आपला पहिला विजय नोंदवण्यास उत्सुक असतील. गट टप्प्यात अपराजित राहिलेल्या गतविजेत्या श्रीलंकेला सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून चार गड्यांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांची केवळ लय बिघडली नाही, तर टी-20 आशिया चषक स्पर्धेतील आठ सामन्यांची प्रभावी विजयी मालिकाही खंडित झाली.
दुसरीकडे, मैदानाबाहेरील घडामोडींनी पाकिस्तान संघाला गाजवले आहे, ज्यामुळे मैदानावरील त्यांच्या खराब कामगिरीवर पडदा पडला आहे. रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून आणखी एक पराभव पत्करल्यानंतर ते गोंधळात पडले आहेत. या स्पर्धेतील ‘मेन इन ब्लू’विऊद्धचा त्यांचा हा दुसरा पराभव आहे. भारत आणि बांगलादेशचे प्रत्येकी दोन गुण आहेत आणि सूर्यकुमार यादवची टीम उत्तम नेट रन रेटमुळे गुणतालिकेत आघाडीवर आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. सावरण्यासाठी फारसा वेळ नसताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आणि त्याच्या संघाला आता वाढत्या दबावाखाली विजय मिळवणे आवश्यक बनले आहे.
माजी कर्णधार बाबर आझम आणि वरिष्ठ फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्या अनुपस्थितीमुळे पाकसमोरील फलंदाजीतील संकट आणखी वाढले आहे, ज्यामुळे तंत्र आणि जिगर याबाबतीत कमतरता असलेल्या संघाचे चित्र समोर आले आहे. भारताविऊद्ध, आघाडीच्या फळीतील फलंदाज साहिबजादा फरहान, फखर जमान आणि सैम अयुब यांनी आशेचा किरण दाखवला. तथापि, उत्तरार्धात डाव पूर्णपणे कोसळला, ज्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान दबाव सहन करण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले.
पाकच्या गोलंदाजी विभागालाही संघर्ष करावा लागला आहे. ओमान आणि यूएईसारख्या खालच्या क्रमांकांवरील संघांविऊद्ध यश मिळवणारा लेगस्पिनर अबरार अहमद प्रभावी भारतीय फलंदाजीविऊद्ध अपयशी ठरला. दुसरीकडे, श्रीलंकेच्याही स्वत:च्या काही समस्या आहेत. बांगलादेशविऊद्ध पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या दासुन शनाकाच्या आक्रमक खेळीमुळे थोडासा दिलासा मिळाला असला, तरी कमकुवत मधली फळी हा चिंतेचा विषय आहे. गट टप्प्यात सलग दोन अर्धशतके झळकावणारा पथुम निस्सांका कठीण परिस्थितीतून जात आहे. तथापि, कुसल मेंडिस व कामिल मिशारा चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. गोलंदाजी विभागात वेगवान गोलंदाज नुवान तुषाराने प्रभावित केलेले आहे. गेल्या आठवड्यात वडिलांच्या निधनानंतर थोड्या काळासाठी अनुपस्थित राहिलेला अष्टपैलू दुनिथ वेलालगेही संघात पुन्हा सामील झाला आहे.
संघ : श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल पेरेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका कऊणारत्ने, महेश थीक्षाना, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान थुषारा, मथिशा पाथिराना.
पाकिस्तान : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.









