एकदा एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, की ती पुन्हा जिवंत होत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य म्हणून स्वीकारले गेले आहे. तथापि, काहीजण या नियमाला अपवाद ठरल्याची वृत्ते नेहमी आपल्या वाचण्यात येतात, किंवा कानावर पडतात. मृत झाल्यानंतर आपल्याला ‘परमेश्वरा’चे दर्शन घडले आणि त्याने आपल्याला परत जाण्याची आज्ञा केली. त्यामुळे आपण परत जिवंत झालो, असे प्रतिपादन करणारे लोकही असतात. तर काही जण मृत्यूनंतर ‘आपल्या ‘यमदूत’ दिसल्याची माहिती देतात. हे किती खरे आणि किती नाही, हा मुद्दा वेगळा असला तरी असे प्रकार घडत असतात. सध्या अमेरिकेतील एक महिला पॅगी रॉबिन्सन हिने दोनदा मृत्यू होऊनही आपण जिवंत आहोत, असे प्रतिपादन केले आहे. या घटनेची सेशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे. या महिलेचे वय सध्या चौसष्ट वर्षांचे आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, मृत्यूचा प्रथम अनुभव तिने वयाच्या पाचव्या वर्षी घेतला. त्यावेळी ती काहीकाळ पूर्णपणे निश्चेष्ट झाली होती. सर्वांची समजूत तिचा मृत्यू झाला आहे, अशीच झाली होती. तथापि, कोणता तरी चमत्कार घडला आणि ती पुन्हा जिवंत झाली. तिचा दुसरा अनुभव याहीपेक्षा थरारक आहे. वयाच्या 25 व्या वर्षी तिला तिची प्रसूती (बाळंतपण) होत असताना असा अनुभव आला. तिला जुळ्या अपत्यांची प्राप्ती झाली होती. पण अपत्यांचा जन्म झाल्यानंतर तिला आपला ‘आत्मा’ आपल्या शरीराबाहेर पडत असल्याची जाणीव झाली. तशा स्थितीत तिने देवाचा धावा केला. आपल्या नवजात अर्भकांसाठी आपल्याला जगणे आवश्यक आहे, ही तीव्र भावना तिच्या ठायी जागृत झाली. आपला आत्मा आकाशात उंच उंच चालला आहे, असा अनुभव तिला आल्याचे प्रतिपादन तिने केले आहे. काही जणांना मते तिला कदाचित हा भास झाला आहे. तथापि, आपला याच देहात पुनर्जन्म झाला आहे, यावर तिचा ठाम विश्वास आहे.









