रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित
पणजी : सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंंडला पकडण्यासाठी सरकार आणि पोलिसांवर राज्यभरातून आलेल्या प्रचंड दबावाच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी या हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित जेनिटो कार्दोज (सांताक्रूझ) याला पणजीतील एका हॉटेलातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पणजीचे निरीक्षक विजय चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने सायंकाळी कार्दोजच्या मुसक्या आवळल्या. जेनिटो हा आगुस्तीनवाडो सांताक्रूज येथील रहिवासी असून सराईत गुन्हेगार म्हणून कुख्यात आहे. दि. गुरुवार 18 सप्टेंबर रोजी दुपारी काणकोणकरवरील हे हल्ला प्रकरण घडले होते. त्यानंतर काही तासांतच पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच प्रकरणाला 24 तास उलटण्याच्या आतच अन्य दोघांना मिळून एकूण 7 जणांना अटक करण्यात आली होती.
जेनिटोने सांगितले हल्ला करण्यास
या अगोदर अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या सखोल चौकशी दरम्यान त्यातील तिघांनी जेनिटोच्या नावाचा उल्लेख करून त्यानेच हे घृणास्पद कृत्य करण्यास सांगितल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून पोलिस जेनिटोच्या मागावर होते, असे गुप्ता यांनी सांगितले.
बाराजणांना प्र्र्र्र्र्रतिबंधात्मक अटक
दरम्यानच्या काळात वरील सात जणांव्यतिरिक्त संशयित म्हणून पोलिसांनी आणखी 14 जणांना शनिवारी ताब्यात घेतले होते. त्यामधील 12 जणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघेजण आधीच अटक केलेल्या परंतु या प्रकरणात सहभागी नसलेल्या आरोपींशी संबंधित असून सतीश विनोद भारती (19), मेरशी आणि यशवंत निप्पाणीकर (47), सांताक्रूज अशी त्यांची नावे आहेत. सराईत गुन्हेगार म्हणून अटक केलेल्या नऊ जणांमध्ये आसिफ अली बडेकर (36 -चिंबल), सूरज शेट्यो (48 -मेरशी), लॉरेन्स डायस (41 -मेस्ताभाट मेरशी), अनिकेत नाईक (32 -जुने गोवे), गौरेश नाईक (39 -मेरशी), आदम सन्मान उत्कुरी (52 -चिंबल), डॉम्निक नाझारेथ (39 -मेरशी), करीमसाब गनीसाब बेपारी (36-सांताक्रूज) आणि चेतन कोरगावकर (35 -सांताक्रूज) यांचा समावेश आहे. गैरवर्तनाच्या आरोपाखाली शेल्टन फ्रान्सिस परेरा (24 -चिंबल) याच्यासह एकूण 23 जणांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुप्ता यांनी पुढे दिली.









