जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकाद्वारे माहिती : तालुकानिहाय आकडेवारी जाहीर
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणाला सोमवार दि. 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात सुमारे 12 लाख कुटुंबांचे वास्तव्य आहे. मागासवर्गीय आयोगाच्या मार्गसूचीनुसार गणतीची प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. गणतीच्या उपक्रमात शिक्षक व इतर सरकारी कर्मचारी भाग घेणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय कुटुंबांची संख्याही जाहीर केली आहे. अथणी तालुक्यात 1 लाख 880, बैलहोंगल तालुक्यात 91 हजार 460, बेळगाव तालुक्यात 30 हजार 700, चिकोडी तालुक्यात 1 लाख 61 हजार, गोकाक तालुक्यात 1 लाख 32 हजार 200, हुक्केरी तालुक्यात 1 लाख 1 हजार 800, खानापूर तालुक्यात 64 हजार 200, रायबाग तालुक्यात 80 हजार 300, रामदुर्ग तालुक्यात 62 हजार 100 व सौंदत्ती तालुक्यात 80 हजार 500 कुटुंबे आहेत.
शिक्षक व इतर सरकारी अधिकारी या सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहेत. याआधीच हेस्कॉमकडून प्रत्येक घरातील वीजमीटरना स्टीकर लावण्यात आले आहे. प्रत्येक घरांना युएचआयडी निश्चित करण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्याला किमान 150 घरांप्रमाणे सुमारे 10 हजार 803 शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांना याकामी जुंपण्यात आले आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. 50 गणतीदारांना एक मास्टर ट्रेनर प्रमाणे 200 ट्रेनरांची नियुक्ती करून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. 20 गणतीदारांना एकाप्रमाणे 525 सुपरवायझरांची नियुक्ती करण्यात आली आहे. एनआरएलएम सेल्फहेल्प ग्रुपकडून गणतीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी प्रचारही करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क येत नाही, अशी ठिकाणेही निश्चित करण्यात आली असून जवळच्या सरकारी इमारतीत कॅम्प करून अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. 7 ऑक्टोबरपर्यंत ही गणती चालणार आहे.









