नागरिकांचा प्रश्न : स्वच्छतागृह सुरू करून गैरसोय टाळा
बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून स्वच्छतागृह बांधण्यात आले खरे. परंतु ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वच्छतागृह वापराविना पडून आहे. त्यामुळे स्वच्छतागृह केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. शहरासह तालुक्यातील नागरिक प्रशासकीय कामासाठी तहसीलदार कार्यालयात येत असतात. बेळगाव तहसीलदार कार्यालयात कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात गळणारे छत तसेच दुर्गंधी यामुळे थांबणेही कठीण होते. अशा वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असल्याने ते देखील वैतागले आहेत.
स्वच्छतागृह त्वरित खुले करण्याची मागणी
स्वच्छतागृह नसल्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच दुर्गंधीही पसरत होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून नवीन स्वच्छतागृह उभारण्यात आले. परंतु, अद्याप हे स्वच्छतागृह खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे खर्च केलेला निधी वाया गेल्याचे दिसून येत आहे. तरी स्वच्छतागृह त्वरित खुले करून नागरिकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.









