आज चामुंडी टेकडीवर अधिकृतपणे मिळणार चालना : जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण
प्रतिनिधी/ बेंगळूर
जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सव सोमवारपासून प्रारंभ होत आहे. दसऱ्याचे उद्घाटन सोमवारी चामुंडी टेकडीवर होणार आहे. बुकर पारितोषिक विजेत्या बानू मुश्ताक यांच्या हस्ते यावेळी म्हैसूर दसरोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. चामुंडेश्वरी देवीची पूजा करण्याद्वारे चामुंडी टेकडीवर यंदाच्या 11 दिवसांच्या दसऱ्याला अधिकृतपणे चालना दिली जाणार आहे.
सोमवारी चामुंडी टेकडीवर होणाऱ्या दसऱ्याच्या उद्घाटनासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय नेते दसऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बानू मुश्ताक यांना दसरोत्सवाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिल्याने सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्ष भाजपने कडाडून विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर चामुंडी टेकडीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने दसऱ्याच्या उद्घाटनासाठी कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्व तयारी केली आहे.
सोमवारी दसरोत्सवाला चालना मिळणार असून यंदा दसरा 10 दिवस चालणार आहे. 2 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी विश्वविख्यात जम्बोसवारी आयोजित करण्यात आली आहे. चामुंडी देवी विराजमान होणारी सोनेरी अंबारी घेऊन हत्ती जम्बो सवारीत सहभागी होतील. जम्बो सवारी अद्वितीय आणि रोमांचक बनवण्यासाठी आवश्यक तयारी जोमात सुरू आहे. जम्बो सवारीदरम्यान अंबारीवर विराजमान असलेल्या चामुंडीच्या पुतळ्याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह विविध मंत्री, अध्घ्कारी पुष्प अर्पण करतील. तत्पूर्वी राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर शुभ मुहूर्तावर नंदी ध्वजाची पूजा केली जाईल.
विद्युत रोषणाईने उजळले शहर
सोमवारपासून सुरू होणाऱ्या म्हैसूर दसरोत्सवानिमित्त, सांस्कृतिक शहर म्हैसूर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. संपूर्ण शहरभरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. म्हैसूर दसऱ्यात लोकांना एकत्रितपणे सहभागी होता यावे यासाठी म्हैसूरमधील सर्व रस्ते आणि पदपथांची दुऊस्ती करण्यात आली आहे. दसरा उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आले असून संपूर्ण म्हैसूर शहरातील मोक्मयाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दसरा गेम्समध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट प्रमुख पाहुण्या
म्हैसूर दसरा गेम्सला सोमवारपासून शानदार सुऊवात होणार आहे. जगप्रसिद्ध ऑलिम्पियन कुस्तीगीर विनेश फोगाट प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी सायंकाळी 5 वाजता म्हैसूरच्या चामुंडी विहार इनडोअर स्टेडियममध्ये दसरा गेम्सचे उद्घाटन करतील.









