वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता दिल्ली रणजी संघाचा माजी कर्णधार मिथुन मनहासने आपला अर्ज दाखल केला आहे.
1997-98 ते 2016-17 या कालावधीत मिथुन मनहासने 157 प्रथम श्रेणी सामने, 130 लिस्ट अ आणि 55 आयपीएल स्पर्धेतील सामने त्याने खेळले आहेत. गेल्या महिन्यात रॉजर बिन्नी बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने नव्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. पुढील रविवारी अखिल भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मंडळाच्या विविध पदांसाठी निवडणुकीकरीता मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अरुण धुमल हे आयपीएलच्या नियंत्रण समितीचे प्रमुख आहेत. राजीव शुक्ला यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
आतापर्यंत या निवडणुकीकरीता बीसीसीआयचे सचिव देवजीत सायकिया, आयपीएलच्या नियंत्रण मंडळाचे चेअरमन अरुण धुमल, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू रघुराम भट यांनीही मंडळाच्या खजिनदारपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मंडळाचे माजी खजिनदार प्रभतेज भाटीया यांची संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांच्या जागी नियुक्ती केली जाणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जयदेव शहा यांची बीसीसीआयच्या कार्यकारी मंडळात दिलीप वेंगसरकर यांच्या जागी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून सायकिया हे मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
येत्या दोन दिवसांमध्ये विंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार असल्याची माहिती सायकिया यांनी दिली आहे. उभय संघातील पहिली कसोटी 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान अहमदाबाद येथे तर दुसरी कसोटी 10 ते 14 ऑक्टेबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे. भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे राहिल.









